पुढारी ऑनलाईन डेस्क: जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती, टेस्ला आणि एक्स या कंपन्यांचे सीईओ एलन मस्क यांनी ईव्हीएम (EVM) बाबत खळबळजनक दावा केला आहे. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन हॅक होऊ शकते, त्यामुळे ते काढून टाकले पाहिजेत", असे एलन मस्क (Elon musk) यांनी म्हटले आहे.
एक्स आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी X पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आपण इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) काढून टाकली पाहिजेत, कारण ते मानव किंवा AI द्वारे हॅक होण्याचा धोका कमी अधिक प्रमाणात आहे". दरम्या,न मस्क यांनी अमेरिकन निवडणुकांमधून देखील इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) काढून टाकण्याची मागणी केली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियरच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना मस्क (Elon musk) यांनी ईव्हीएम संदर्भातील प्रतिक्रिया दिली आहे.
केनेडी ज्युनियर यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, असोसिएटेड प्रेसच्या म्हणण्यानुसार, अमेरिका कॅरिबियन ॲंटिल्स भागातील पोर्तो रिकोमधील प्रांतातील प्राथमिक निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांशी संबंधित शेकडो मतदान अनियमिततेची प्रकरणं अनुभवायला मिळाली. परंतु सुदैवाने याठिकाणी पेपर ट्रेल असल्याने समस्या ओळखण्यात आली. त्यानंतर मतांची संख्या दुरुस्त करण्यात आली. जिथे पेपर ट्रेल नाही अशा अधिकारक्षेत्रात काय होते? असा प्रश्न देखील रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांनी उपस्थित केला आहे. (Elon musk)
यूएस नागरिकांना हे माहित असणे आवश्यक आहे की, त्यांच्या प्रत्येक मताची मोजणी झाली आहे. त्यांच्या निवडणुका हॅक केल्या जाऊ शकत नाहीत. निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेप टाळण्यासाठी आम्हाला कागदी मतपत्रिकांवर परत जाणे आवश्यक आहे, अशी मागणी देखील अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांनी केली आहे.
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) हॅक होवू शकते. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका ईव्हीएमचा वापर करु नका, असा सल्ला जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती इलॉन मस्क यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला आहे. मस्क यांची पोस्ट रिपोस्ट करत तसेच एका दैनिकातील ईव्हीएम संदर्भातील वृत्ताचा हवाला देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा 'ईव्हीएम'च्या वस्तुनिष्ठतेवर सवाल केले आहेत.
राहुल गांधी यांनी आपल्या X पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'भारतातील ईव्हीएम एक "ब्लॅक बॉक्स" आहे . ते कोणालाही तपासण्याची परवानगी नाही. आमच्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्वाचा अभाव असतो, तेव्हा लोकशाहीची फसवणूक होते आणि फसवणूक होण्याची शक्यता वाढते.