चीनच्या ताब्यात युगांडाचे एंटेब्बे आंतरराष्ट्रीय विमानतळ | पुढारी

चीनच्या ताब्यात युगांडाचे एंटेब्बे आंतरराष्ट्रीय विमानतळ

कंपाला : वृत्तसंस्था ; पूर्व आफ्रिकेतील युगांडा या देशातील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले ‘एंटेब्बे’ आता चीनच्या ताब्यात आले आहे. एंटेब्बे आंतरराष्ट्रीय विमानतळासह युगांडातील इतर मालमत्तांवर चीन ने आता कब्जा जमविला आहे.

युगांडाने चीनकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड मुदतीत न केल्यामुळे ही वेळ ओढविली आहे. गरिब व गरजू देशांना कर्जे देऊन विस्तारवाद राबविणे हा चीनच्या धोरणाचा एक भाग आहे.

युगांडाचे राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 17 नोव्हेबर 2015 रोजी अँटेब्बे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकास आणि विस्तारासाठी चीनच्या एक्झिम बँकेकडून कर्जासाठी करार केला होता. युगांडा अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार करारान्वये 20 कोटी 70 लाख डॉलर कर्जासाठी हा करार होता.

आणि सात वर्षांच्या सवलतीचा कालावधी धरून कर्जाच्या परिपक्‍वतेचा एकूण कालावधी 20 वर्षांचा होता. मात्र चीनच्या एक्झिम बँकेच्या म्हणण्यानुसार करारान्वये कर्जफेडीची मुदत संपलेली आहे आणि युगांडाने करारातील अटीशर्तींनुसार एंटेब्बे विमानतळ आम्हाला हस्तांतरित केले आहे.

शिष्टमंडळ रिकाम्या हाती…

युगांडाचे राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांनी करारातील अटीशर्तींबद्दल पुनर्विचार करावा म्हणून चीन सरकारच्या मनधरणीसाठी मार्च 2021 मध्ये एक शिष्टमंडळ बीजिंगला पाठवले होते. मात्र त्याला यश आले नाही.

पश्‍चिमेकडील देश विकसनशील वा गरिब देशांना कर्ज देतात तेव्हा त्याला सहायता निधी म्हटले जाते. चीन तसे करतो, तेव्हा त्याला कर्जाचे मायाजाल म्हटले जाते. चीनविरुद्ध माध्यमांचा हा प्रपोपंडा आहे.
वू पेंग, महासंचालक, आफ्रिकन विभाग, बीजिंग

Back to top button