omicron corona बद्दल फार भीतीचे कारण नाही; तज्ज्ञांचे मत | पुढारी

omicron corona बद्दल फार भीतीचे कारण नाही; तज्ज्ञांचे मत

केपटाऊन; वृत्तसंस्था : बोत्सवानामध्ये सर्वांत आधी ओमिक्रॉन व्हेरियंट (omicron corona) आढळल्यानंतर दक्षिण आफ्रिकेत या व्हेरियंटचे जिनोम सिक्‍वेन्सिंग सर्वांत आधी करण्यात आले. ते करणार्‍या संशोधकांनीच या व्हेरियंटला ‘बी. 1.1.529’ हे नाव दिले होते. संशोधक चमूतील अँजेलिक कोईट्झी यांनीच जगाला सर्वांत आधी या व्हेरियंटबद्दलची विस्तृत माहिती दिली. अँजेलिक यांनी आता जगाला उद्देशून या व्हेरियंटबद्दल नाहक भीती बाळगण्याचे कारण नाही, असे आवाहन केले आहे.

ओमिक्रॉन व्हेरियंटचा (omicron corona) संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये लक्षणे अगदी सौम्य होती, अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे. या व्हेरियंटच्या रुग्णांपैकी अनेक जण हे रुग्णालयात दाखल न होताही ठणठणीत झालेले आहेत. व्हेरियंटबद्दल सविस्तर तपशील उपलब्ध नसताना उगीच त्याबद्दल कथित तज्ज्ञ लोक वेगवेगळी मते व्यक्‍त करत आहेत, हे वैज्ञानिक द‍ृष्टिकोनाला धरून नाही, अशी कानउघडणीही अँजेलिक कोईट्झी यांनी कली आहे.

अँजेलिक कोईट्झी या दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या प्रमुखही आहेत. ‘असोसिएट फ्री प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले, की गेल्या 10 दिवसांमध्ये या व्हेरियंटची लागण झालेले 30 रुग्ण पाहिले. थकवा जाणवत असल्याने ते दवाखान्यात आले होते. ओमिक्रॉनची बाधा झालेल्यांत स्नायू दुखी, घशात खवखव, कोरडा खोकला अशी सौम्य स्वरुपाची लक्षणे होती. अपवाद म्हणून काही रुग्णांना ताप आला होता, असेही त्या म्हणाल्या.

ओमिक्रॉनआधी आढळलेल्या व्हेरियंटची लागण या तुलनेत बर्‍यापैकी जास्त तापदायक होती, असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत, अशा रुग्णांमध्ये या व्हेरियंटची लक्षणे सौम्य होतीच, ज्यांनी लसच घेतलेली नाही, अशा ओमिक्रॉन रुग्णांमध्येही लक्षणे सौम्यच होती, असे अँजेलिक कोईट्झी म्हणाल्या.

Back to top button