ओमिक्रॉन : दक्षिण आफ्रिकेवर प्रवासबंदी | पुढारी

ओमिक्रॉन : दक्षिण आफ्रिकेवर प्रवासबंदी

न्यू यॉर्क/हेग ; वृत्तसंस्था : प्रत्येक तासाला ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या अवताराचा फैलाव होत असल्याने जग हादरून गेले आहे. पहिला रुग्ण आढळलेल्या दक्षिण आफ्रिकेवर जगभरातील प्रमुख देशांनी प्रवास बंदी जाहीर केली आहे. अमेरिकेत ओमिक्रॉनचा रुग्ण आढळला नसला तरी न्यू यॉर्कमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून 3 डिसेंबरपासून आणीबाणी जारी केली आहे.

ब्रिटन, ऑस्ट्रिया, कॅनडा, जर्मनी, इटली आणि नेदरलँडस्ने आफ्रिकन देशांतून येणार्‍या विमानसेवेवर बंदी घातली आहे. तसेच अमेरिका, सौदी अरेबिया, श्रीलंका, ब्राझीलसह अन्य देशांनीही आफ्रिकन विमानसेवेवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्यमंत्र्यांनी ही बंदी आयोग्य असल्याचे म्हटले आहे. सोमवारपासून दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, झिम्बाब्वे, नामिबिया, लेसोथो आदी देशांतील विमानसेवा बंद करण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी घेतला आहे. न्यूयॉर्कमध्येे सर्वच दवाखान्यांमध्ये अनावश्यक शस्त्रक्रिया स्थगित केल्या जातील.

जपानने केले कडक नियम

आफ्रीकेतून येणार्‍या प्रवाशांना आता 10 दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल. सिंगापूर, मलेशिया, दुबई, सौदी अरेबिया जॉर्डनसाठीही कडक नियम असतील.

ऑस्ट्रेलियात 14 दिवस बंदी

ऑस्ट्रेलियाचे आरोग्यमंत्री ग्रेग हंट म्हणाले, सुरक्षेचा विचार करून आफ्रिकन देशांतून येणार्‍या विमानांना 14 दिवसांची बंदी घातली आहे. तसेच तेथून येणार्‍या सर्व नागरिकांना 14 दिवस क्वारंटाईन व्हावे लागणार आहे.

द. आफ्रिकेशी संपर्क तोडण्याची धडक मोहीम

ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले असून हे दोघेही दक्षिण आफ्रिकेहून परतले आहेत. परिणामी, दक्षिण आफ्रिकेशी संपर्क तोडण्याची धडक मोहीम जगभरातील देशांनी हाती घेतली आहे. हाँगकाँग आणि बोत्सवानानंतर इस्त्रायल आणि बेल्जियमध्ये या नव्या व्हेरिंयटचे रुग्ण आढळलेे आहेत. शनिवारी झेक आणि जर्मनीतही ओमिक्रॉन दाखल झाला. नेदरलँडमध्येही 600 पैकी 61 प्रवासी पॉझिटिव्ह ठरले.

बंदी अयोग्य : दक्षिण आफ्रिकेचे आरोग्यमंत्री

दक्षिण आफ्रिकेचे आरोग्यमंत्री जो फाला म्हणाले, विमानसेवेवर घातलेली बंदी अयोग्य आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट किती धोकादायक आहे हे अजून सिद्ध झालेले नाही. अशा प्रकारची बंदी घालणे जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांच्या विरुद्ध आहे.

Back to top button