पुढारी ऑनलाईन डेस्क : इराणने मंगळवारी पाकिस्तानमध्ये घुसून बलुचिस्तानमध्ये हवाई हल्ला केला. बलुचिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश अल-अदलच्या दोन तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा इराणने केला आहे. बलुचिस्तानच्या पंजगुर जिल्ह्यातील एक मशीदही उद्ध्वस्त झाली असून, इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात दोन जण ठार झाले आहेत. इराणच्या या कृतीवर पाकिस्तानने तीव्र नाराजी व्यक्त केली असून याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, असा इशारा दिला आहे. मात्र इराणने केलेल्या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचे स्पष्ट झाले आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी यापूर्वीही पाकिस्तानवर असे हल्ले झाले आहेत. यानंतर केवळ पोकळ वल्गना करुन पाकिस्तान शांत होतो, असा इतिहास आहे. (Iran fires missiles at Pakistan) जाणून घेवूया कोणत्या देशांनी पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादावर केलेल्या कारवाईविषयी….
पाकिस्तान हा दहशतवादासाठी आश्रयस्थान आहे. भारताने याबाबत अनेकवेळा पुरावेही दिले आहेत. मात्र पाकिस्तान हे आरोप फेटाळून लावत असला तरी जगातील मोस्ट वॉटेंड दहशतवादी ओसामा बिल लादेन यालाही पाकिस्तानने आश्रय दिला होता.अबोटाबादमध्ये त्याचे वास्तव्य होते. 1 मे 2011 रोजी अमेरिकेन लष्कराच्या आर्मी सील कमांडोंनी ओसामा बिन लादेनला अबोटाबाद येथे MH-60 हेलिकॉप्टरमधून धडक कारवाई करत लादेनचा खात्मा केला. विशेष म्हणजे हा कारवाईची पाकिस्तानी लष्कराला मागसूसही नव्हता. कारवाईनंतर अमेरिकेने जाहीर केल्यानंतर पाकिस्तान लष्कराला या कारवाईची माहिती झाली होती. मात्र अमेरिकेच्या आश्रयाखालीच असणार्या या देशाने केवळ शाब्दीक थयथयाट करत आपला राग व्यक्त केला. ही कारवाई विसरत अमेरिकेबरोबर असणारी मैत्री अबाधित ठेवली.
जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात भारतीय लष्कराचे १९ जवान शहीद झाले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून २९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय लष्कराने पाकिस्तानी हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. सर्जिकल स्ट्राईकमध्ये भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी तळांवर हल्ला केला. सर्जिकल स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या लाँच पॅडच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. अशी कारवाई झाली नसल्याचा दावा करत पाकिस्तानने आपल्यावर ओढावलेली नामुष्कीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता.
२०१९ मध्ये भारतीय हवाई दलानेही पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांना लक्ष्य केले होते. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ( सीआरपीएफ ) ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्यात पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा सहभाग असल्याचे पुरावे मिळाले. यानंतर भारताने प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या बालाकोट भागात हवाई हल्ले केले आणि अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.