पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत सरकारने १५ मार्चपूर्वी मालदीवमधून आपले लष्कर मागे घ्यावे, असे अध्यक्ष मोहम्मद मुईझ्झू यांनी म्हटले आहे, असे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे. मालदीव सरकारच्या विनंतीवरून मागील अनेक वर्षांपासून मालदीवमध्ये भारतीय लष्कराचे जवान तैनात आहेत. सागरी सुरक्षा आणि आपत्ती निवारणासाठी मदत करणे हा येथे तैनात असणार्या भारतीय लष्कराचा मुख्य उद्देश आहे. ( Maldives asks India to withdraw its military presence )
मालदीव सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, राष्ट्राध्यक्ष मुईझ्झू यांनी औपचारिकपणे भारताला आपले लष्करी कर्मचारी १५ मार्चपर्यंत मागे घेण्यास सांगितले आहे. त्यांच्या कार्यालयातील सचिव अब्दुल्ला नाझिम इब्राहिम म्हणाले, 'भारतीय लष्करी कर्मचारी मालदीवमध्ये राहू शकत नाहीत. हे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुईझ्झूआणि या सरकारचे/प्रशासनाचे धोरण आहे. सरकारी आकडेवारीनुसार, मालदीवमध्ये 88 भारतीय लष्करी कर्मचारी आहेत.
'पीटीआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, मालदीव आणि भारताने सैन्य मागे घेण्याबाबत चर्चा करण्यासाठी एक उच्चस्तरीय कोअर ग्रुप तयार केला आहे. रविवारी सकाळी माले येथील परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात त्याची पहिली बैठक झाली. या बैठकीला भारतीय उच्चायुक्त मुनू महावरही उपस्थित होते. अध्यक्ष मुइझ्झू यांच्या कार्यालयातील सचिव अब्दुल्ला नाझिम इब्राहिम यांनीही बैठकीला दुजोरा दिला. १५ मार्चपर्यंत सैन्य मागे घेण्याची विनंती हा बैठकीचा अजेंडा असल्याचे त्यांनी सांगितले. भारत सरकारने अद्याप या मीडिया वृत्ताला दुजोरा दिलेला नाही किंवा संपूर्ण घटनेवर कोणतेही भाष्य केलेले नाही.
मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षव्दीप दौर्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर भारत आणि मालदीवमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहे. अशातच चीनचा दौर्यावरुन परतल्यानंतर मुईझ्झू यांनी "भारताने धमकी देवू नये," अशी भाषा सुरु केली. आता लष्कर मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. ( Maldives asks India to withdraw its military presence ) चीन दौर्याची सांगता झाल्यानंतर शनिवारी( दि.१३) माध्यमांशी बोलताना मालदीवचे अध्यक्ष मुईइ्झू भारतावर अप्रत्यक्ष टीका करताना म्हणाले की, कोणत्याही देशाला आम्हाला धमकवण्याचा अधिकार नाही. आम्ही लहान असू शकतो; परंतु हा तुम्हाला आमच्यावर दादागिरी करण्याचा परवाना देत नाही."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्याबद्दल मालदीवच्या काही राजकीय नेत्यांनी मंत्र्यांसह अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यात वाद निर्माण झाला आहे. मालदीवच्या मंत्र्यांनी मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याचा अंदाज भारतीय पर्यटकांना मालदीवपासून लांब राहण्यचा सल्ला मानला. भारताने मालदीवकडे हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ७ जानेवारी रोजी तीन मंत्र्यांना त्यांच्या पदावरून निलंबित करण्यात आले. यानंतर मालदीवच्या भारतातील राजदूतांना समन्स बजावण्यात आले. त्यांना भारतीय परराष्ट्र मंत्रालयात बोलावण्यात आले. त्यांनी पंतप्रधान मोदींविरोधात सोशल मीडिया पोस्टबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली होती. ( Maldives asks India to withdraw its military presence )
मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे भारतीय संतप्त झाले. मालदीवमध्ये साजरी करण्यात येणार्या नियोजित सुट्ट्या रद्द केल्या यानंतर चीनमध्ये राज्य दौऱ्यावर असलेले मालदीवचे अध्यक्ष मुइझ्झू यांनी आमच्या देशात अधिक पर्यटकांना पाठवा, अशी याचनाच चीनला केली आहे.
हेही वाचा :