चीन मध्येही डेल्टा व्हेरियंट; निर्बंध लागू | पुढारी

चीन मध्येही डेल्टा व्हेरियंट; निर्बंध लागू

बीजिंग ; वृत्तसंस्था : चीन सध्या कोरोना विषाणूच्या सर्वाधिक वेगाने फैलावणार्‍या डेल्टा व्हेरियंटशी झुंजत आहे. चीनच्या पूर्वेकडील भागांत येण्या-जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. गेल्या आठवडाभरापासून हा व्हेरियंट देशभरात (21 प्रांतांतून) आढळून येत आहे. यामुळे विविध प्रकारचे निर्बंध घालण्यात आले आहेत.

चीन सरकारने डेल्टा व्हेरियंटचे रुग्ण आढळलेल्या क्षेत्रांमध्ये चाचण्या वाढविल्या आहेत. मनोरंजनाचे, सांस्कृतिक व इतर कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. पर्यटन, दळणवळण थांबविले आहे.

महामारीच्या सुरुवातीपासून ते आजतागायत चीनमध्ये केवळ 98 हजार 315 कोरोना रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे, जगातील पहिला कोरोना रुग्ण चीनमध्येच आढळला होता. वुहानमध्ये या आजाराची साथ सर्वप्रथम फोफावली. तेव्हाही उर्वरित चीनमध्ये आनंदीआनंद होता. यातूनच कोरोनाच्या उद्भवासंदर्भात अवघे जग चीनकडे संशयाने पाहत आले आहे.

चीनच्या वुहान प्रयोगशाळेतून हा विषाणू लीक झाला, जैवास्त्र म्हणून चीनने ठरवून कोरोना विषाणूची निर्मिती केली, असे आरोपही जगभरातून सातत्याने होत आले आहेत.

अधिकृत आकडेवारीनुसार, 17 ऑक्टोबर आणि 14 नोव्हेंबरदरम्यान डेल्टा व्हेरियंटचे एकूण 1 हजार 308 रुग्ण आढळले आहेत. उन्हाळ्यात आढळलेल्या 1 हजार 280 रुग्णांपेक्षा ही संख्या जास्त आहे. म्हणूनच सध्याचा प्रादुर्भाव हा चीनमधील सर्वाधिक गतिमान मानला जात आहे. 14 नोव्हेंबरपर्यंत चीनमध्ये 98 हजार 315 रुग्ण आढळले. यात परदेशातून आलेल्यांचाही समावेश आहे. चीनमध्ये कोरोनाने आजवर 4 हजार 636 मृत्यू झाले आहेत.

डालियानमध्ये पहिला ‘डेल्टा’

डालियान शहरात डेल्टाचा पहिला रुग्ण 4 नोव्हेंबरला आढळला होता. 75 लाख लोकसंख्येचे हे शहर आहे. डालियानहून अन्य शहरांत जाणार्‍या लोकांना 14 दिवस क्वारंटाईन केले जात आहे.

Back to top button