पुढारी ऑनलाईन डेस्क : पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने गेल्या आठवड्यात इस्रायलवर हल्ला केला. या हल्ल्यात १ हजार ३०० नागरिक मारले गेले, तर १ हजार ९०० लोक जखमी झाले. या हल्ल्यामधील दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या क्रूर घटना समोर येत आहेत. या दहशतवाद्यांनी गाझा पट्टीत नरसंहार सुरूच आहे. यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी 'हमास' ही दहशतवादी संघटना 'अल-कायदा'पेक्षाही घातक असल्याचे म्हटले आहे. या संदर्भातील वृत्त 'इंडिया टुडेने' दिले आहे. (Joe Biden on 'Hamas')
अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील एका कार्यक्रमात बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले, जितकं आपल्याला हमास हल्ल्यासंदर्भात माहित होत आहे, तितकेच ते भयावह आहे. हजारांहून अधिक निष्पाप लोकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. अमेरिकतील देखील २७ लोक हमासच्या या भयंकर हल्ल्यात मारले गेले, असे देखील बायडेन यांनी सांगितले. ((Joe Biden on 'Hamas'))
जो बायडेन पुढे म्हणाले, 'या लोकांसमोर अल कायदाही कमी पडेल. हे लोक राक्षसासारखे आहेत. अमेरिकेने इस्रायलच्या पाठीशी उभे राहून कोणतीही चूक केलेली नाही. अमेरिका इस्रायलच्या पाठीशी उभी आहे. परराष्ट्र सचिव अँटनी ब्लिंकन नुकतेच इस्रायलहून परतले आणि आज अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन इस्रायलमध्ये आहेत. इस्त्रायलच्या सुरक्षेसाठी आणि प्रत्युत्तराच्या कारवाईत कोणतीही कमतरता राहणार नाही याची आम्ही खात्री करत आहोत, असेदेखील अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी स्पष्ट केले.
गाझा पट्टीतील मानवनिर्मित संकंटाकडे लक्ष देणे हे आम्ही आमचे प्राधान्य आहे. अमेरिका मध्य पूर्वेतील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि इस्रायल, इजिप्त, जॉर्डन आणि इतर अरब देशांशी सतत चर्चा करत आहे. आम्हाला माहित आहे की बहुतेक पॅलेस्टिनी हमासला समर्थन देत नाहीत. मी इस्रायलवरील हल्ल्यात ओलिस ठेवलेल्या आणि बळी पडलेल्या अमेरिकन नागरिकांच्या कुटुंबियांशी बोललो. लोकांना त्यांचे प्रियजन, ते कुठे आहेत आणि ते कोणत्या स्थितीत आहेत याबद्दल काहीच माहिती नाही. आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. हमासने ओलीस ठेवलेल्या अमेरिकन नागरिकांची संरक्षा आणि सुटकेसाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहोत, असेदेखील जो बायडेन यांनी म्हटले आहे.