भारतातील टाकाचर ला आंतरराष्ट्रीय अर्थशॉट सन्मान! | पुढारी

भारतातील टाकाचर ला आंतरराष्ट्रीय अर्थशॉट सन्मान!

लंडन ; वृत्तसंस्था : हवामानातील बदलाच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीला वाचविण्यासाठी जगभरात विविध पातळ्यांवर सुरू असलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन म्हणून राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे नातू राजपुत्र विल्यम यांनी आंतरराष्ट्रीय अर्थशॉट पुरस्कार सुरू केले आहेत. रविवारी सायंकाळी लंडन येथे अलेक्झांड्रा राजवाड्यात झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात पाच विजेत्यांची नावे जाहीर करण्यात आली. प्रत्येकाला 1.4 दशलक्ष डॉलर (10 लाख ब्रिटिश पाऊंड) रोख देण्यात आले आहेत. भारतातील विद्युत मोहन यांच्या नेतृत्वाखालील टाकाचर या समूहाला इको ऑस्कर म्हणून ओळखला जाणारा हा सन्मान यंदा प्राप्त झाला आहे.

ड्यूक ऑफ केम्ब्रिज विल्यम यांनी पृथ्वीचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करणार्‍यांसाठी हा पुरस्कार सुरू केला आहे. विद्युत मोहन हे जगभरातील यंदाच्या 5 विजेत्यांपैकी एक आहेत. दिल्लीतील या उद्योजकाला पिकांतील टाकाऊ भागाला विक्रीयोग्य जैव उत्पादनांत परिवर्तित करण्याच्या प्रकल्पाबद्दल हा सन्मान देण्यात आला आहे.

विद्युत मोहन यांच्या ‘टाकाचर’ स्टार्टअपनेपिकांतील टाकाऊ भाग विक्रीयोग्य जैव उत्पादनात बदलणारे अत्यंत परवडणारे असे तंत्र विकसित केले आहे. त्यासाठीच ‘आमच्यासाठी शुद्ध हवा’ या श्रेणीतील विजेतेपद त्यांना प्राप्त झाले आहे.

समारंभापूर्वी विल्यम यांचे मुद्रित भाषण ऐकविण्यात आले. ते म्हणाले, वेळ हातातून निसटत चालली आहे. दहा वर्षांचा कालावधी तसा फार मोठा वाटत नाही. पण पुढची दहा वर्षे पृथ्वीला वाचवण्यासाठी आम्ही काय करणार आहोत आणि काय करणार नाही, यावरच पृथ्वीचे भवितव्य अवलंबून असेल. मानव जातीकडे प्रत्येक समस्येवर उपाय शोधून काढण्याची अद्भुत क्षमता आहे.

टाकाचर समूहाचे तंत्र धूर उत्सर्जनाचे प्रमाण तब्बल 98 टक्क्यांनी कमी करते. हवेची गुणवत्ता सुधारण्यात त्यांच्या तंत्राचा मोठा उपयोग होईल. या तंत्राचा वापर करून वर्षभरात एक अब्ज टनांपर्यंत कार्बन डायऑक्साईडची कपात हवेतून होऊ शकते. ‘जलवायू परिवर्तना’विरुद्धच्या लढ्यात भारतीय शेतकर्‍यांचा विजय म्हणून या तंत्राकडे पाहिले जात आहे.

‘टाकाचर’चे तंत्र नेे-आण करण्यास सोपे आहे. हे संयंत्र ट्रॅक्टरला जोडले जाते. पिकांच्या अवशेषांवर प्रक्रिया करून जैव उत्पादनांत उदा. इंधन, उर्वरकांत ते परिवर्तित करते.

जगभरात आम्ही जवळपास 120 अब्ज डॉलर किमतीचे कृषी अवशिष्ट (टाकाऊ) वाया घालवतो. जे विक्रीयोग्य नसते ते शेतकरी जाळून टाकतो. त्यामुळे प्रदूषण होते. दिल्ली तर या समस्येमुळे संपूर्णपणे संकटात सापडली आहे. विद्युत मोहन यांनी त्यावर उपाय दिलेला आहे.

बहामाज येथील कोरल व्हिटा, इटलीतील मिलान शहर, थायी-इटालियन-जर्मन चमू ‘एईएम इलेक्ट्रोलायझर’चा अन्य विजेत्यांत समावेश आहे.

आणखी एक भारतीय

या पुरस्कारासाठी अंतिम फेरीत आणखी एका भारतीयाने स्थान पटकावले होते. तामिळनाडूतील 14 वर्षांची विद्यार्थिनी विनिशा उमाशंकर हे तिचे नाव. तिने सौरऊर्जेवर चालणारी इस्त्री बनवलेली आहे.

Back to top button