अमेरिकेत 2 दिवसांत बुडाल्या 2 बड्या बँका | पुढारी

अमेरिकेत 2 दिवसांत बुडाल्या 2 बड्या बँका

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था 10 मार्च 2023 रोजी अमेरिकेतील 16 वी सर्वांत मोठी सिलिकॉन व्हॅली बँक बुडाली. पुढे 2 दिवसांनी 12 मार्च रोजी अमेरिकेतील सिग्नेचर बँक बुडाल्याची बातमी आली. दोन्ही बँकांची उर्वरित संपत्ती अमेरिकन नियामकांनी आपल्या ताब्यात घेतली. एकटी सिलिकॉन बुडाल्याने जगभरातील गुंतवणूकदारांना 38 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. 21 भारतीय कंपन्यांनाही या घटनेचा फटका बसला आहे.

लोन डिफॉल्ट हे बहुतांशी बँकांच्या बुडण्याचे कारण असते; पण इंटरेस्ट रेट रिस्क आणि लिक्विडिटी रिस्क हे दोन घटक या दोन्ही बँका बुडण्यामागे कारणीभूत ठरलेत. अमेरिकेत गेल्या 40 वर्षांतील सर्वाधिक महागाई सध्या आहे. महागाईवर नियंत्रण यावे म्हणून अमेरिकन फेडरल रिझर्व्हने मार्च 2022 मध्ये अनेकदा व्याजदरात वाढ केली. सध्या हे व्याजदर 4.5 टक्केच्या जवळपास आहेत. गेल्या 15 वर्षांतील हे सर्वाधिक व्याजदर आहेत. फेडरल बँकेच्या उत्पन्नात वाढ झाली. अन्य बँका आणि गुंतवणूकदारांनी कॉर्पोरेट बॉन्डस् आणि सरकारी ट्रेझरी बिल्स खरेदी करण्याऐवजी फेडरल बँकेत पैसा गुंतवणे सुरू केले. कॉर्पोरेट बॉन्डस्, ट्रेझरीचे दर त्यामुळे घटले. सिलिकॉन व्हॅली बँकेने एकूण संपत्तीपैकी 55 टक्के वाटा अमेरिकन सरकारच्या बॉन्डस्मध्ये गुंतविलेला होता. दर घसरल्याने मोठा तोटा सिलिकॉन बँकेला झाला. सिक्योरिटीज पोर्टफोलियोतून विक्रीत 21 अब्ज डॉलरची अपेक्षा असताना या सौद्यात बँकेला 1.8 अब्ज डॉलरचा तोटा झाला. आकड्यांमधील फरक वगळता असेच काहीसे सिग्नेचर बँकेबाबत घडले.

भारतीय बँकांना धोका नाही; कारण…

 भारतीय बँक सिस्टिम विशाल व व्यापक आहेच. शिवाय नियम-कायदे कमालीचे कडक व पारदर्शक आहेत.  एका निश्चित मर्यादेवर जाऊन भारतीय बँका गुंतवणूक करू शकत नाहीत.  सिलिकॉनकडे एकूण संपत्तीच्या तुलनेत 7 टक्के रोकड, तर सिग्नेचरकडे 5 टक्के रोकड होती. आपल्या बँकांत यापेक्षा कितीतरी पटीने पैसा रोकड स्वरूपात असतो.

21 भारतीय स्टार्टअप कंपन्या ‘सिलिकॉन’ बुडाल्याने संकटात

ट्रॅक्सन डेटाच्या माहितीनुसार सिलिकॉन व्हॅली बँकेने 21 भारतीय स्टार्टअप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. हा आकडा अधिक असण्याचीही शक्यता आहे. ब्लूस्टोन, कार्वेल, लॉयल्टी रिवॉर्ड, पेटीएम, पेटीएम मॉल आणि वन97 सारख्या कंपन्यांत सिलिकॉनची गुंतवणूक आहे. या 10 कंपन्यांत सिलिकॉनची सर्वाधिक गुंतवणूक (रक्कम दशलक्ष डॉलरमध्ये)

Back to top button