पुढारी ऑनलाईन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनची राजधानी कीवला सोमवारी भेट दिली. या भेटीतून रशिया विरुद्ध युक्रेन युद्धात अमेरिका ठामपणे युक्रेनच्या बाजूने उभी आहे, हा संदेश बायडन यांनी दिला आहे. २४ फेब्रुवारीला या युद्धाला १ वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीत बायडेन यांनी युक्रेनला अधिकाधिक शस्त्र पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे.
बायडेन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलनेस्की यांनी युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली.
व्हाईट हाऊसने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात बायडेन म्हणतात, "युक्रेन नागरिकांचा हवाई हल्ल्यातून बचाव व्हावा, यासाठी महत्त्वाचे असणारे तोफगोळे, रडार यंत्रणा आणि इतर शस्त्रात्रे पुरवण्याचे आश्वासन मी देत आहे."
"रशियाने एक वर्षापूर्वी युक्रेनवर हल्ला केला. पाश्चात्य देशांत दुफळी आहे आणि युक्रेन कमजोर आहे, असे त्यांना वाटले होते, ही त्यांची चूक ठरली," असे बायडेन यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. झेलनेस्की यांनी बायडेन यांच्या भेटीबद्दल आभार मानले आहेत. "तुमची भेट आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. अमेरिकेचा पाठबळाच हे निदर्शक आहे."
बायडेन यांच्या भेटीचा व्हिडिओ झेलनेस्की यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. "ही भेट औचित्यपूर्ण, धाडसी आणि ऐतिसाहिक आहे," असे ते म्हणाले.
चीनचा रशियाला पाठिंबा?
अमेरिकेचे गृहमंत्री अँटनी ब्लिकेंन यांनी रविवारी चीन रशियाला सहकार्य करण्याचा विचार करत आहे, आणि रशियाला शस्त्रात्र पुरवणार आहे, अशी टीका केली होती. याच अनुषंगाने युरोपीयन युनियनच्या परराष्ट्र धोरण विभागाचे प्रमुख जोसेफ बोरेल यांनी चीनला इशारा दिला होता. रशियाला चीनने शस्त्रात्रे पुरवणे ही युरोपीयन युनियन आणि चीन यांच्यातील लाल रेष ठरेल असे त्यांनी म्हटले होते. यावर चीननेही प्रत्युत्तर दिले आहे. चीन नाही तर अमेरिकाच युद्धभूमीवर शस्त्रात्रे पाठवत आहे, अशी टीका चीनच्या परराष्ट्र विभागचे प्रवक्ते वँग वेबिन यांनी केली आहे.
हेही वाचा