विमान कोसळण्यापूर्वी पत्नीला पाठविला शेवटचा संदेश | पुढारी

विमान कोसळण्यापूर्वी पत्नीला पाठविला शेवटचा संदेश

फ्लोरिडा; वृत्तसंस्था :  बेंजामिन चाफेटझ व बोरूच टौब हे दोन पायलट सिंगल इंजिन असणाऱ्या लहान विमानात बसले. अमेरिकेच्या ओहिओ शहरातील क्लेवलँड येथे राहणाऱ्या या दोघांनी जेएफके आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कुयाहोगाच्या दिशेने उड्डाण केले. १९ जानेवारी हा दिवस आपल्या आयुष्यातील अखेरचा दिवस असेल, याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती.

बीचक्राफ्ट ए ३६ एस या विमानाचे एकमेव इंजिन आकाशात असतानाच बंद पडले. यामुळे आपण आता मरणार, बेंजामिन चाफेटझ व बोरूच टौब यांना कळून चुकले. कारण, एअर ट्रॅफिक कंट्रोलशी असलेला संपर्कही तुटला होता. बेंजामिन नामक पायलटने विमान कोसळण्यापूर्वी पत्नीला मेसेज केला, तो असा, मी तुझ्यावर आणि मुलांवर प्रेम करतो. माझ्याकडून काही चुका झाल्या असल्यास त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहे. पत्नीला असा संदेश पाठविल्यानंतर क्षणार्धात त्यांचे विमान न्यूयॉर्कच्या वेस्टचेस्टर विमानतळापासून दोन मैलांवर असलेल्या जंगलात कोसळले. खराब हवमानामुळे तब्बल पाच तासांच्या शोधानंतर दोघांचेही मृतदेह सापडले. सध्या बेंजामिन यांचा हा हृदयाला भिडणारा मेसेज सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

 

Back to top button