न्यूयॉर्क टाईम्सने पर्यटनासाठी जाहीर केली सर्वोत्कृष्ट स्थळे; भारतातील केरळ पर्यटनस्थळांच्या यादीत | पुढारी

न्यूयॉर्क टाईम्सने पर्यटनासाठी जाहीर केली सर्वोत्कृष्ट स्थळे; भारतातील केरळ पर्यटनस्थळांच्या यादीत

न्यूयॉर्क, वृत्तसंस्था : न्यूयॉर्क टाईम्स या जगप्रसिद्ध वृत्तपत्राने २०२३मध्ये भेट देण्याजोग्या पर्यटनस्थळांची यादी जाहीर केली आहे. या टॉप टेन यादीत भारतातील एकाही स्थळाला स्थान मिळालेले नाही. मात्र, केरळ या एकमेव राज्याने १३वे स्थान मिळविले आहे.

केरळला देवभूमी म्हणजेच ‘गॉडस् ओन कंट्री’ म्हटले जाते. निसर्गदत्त सौंदर्य लाभलेल्या या राज्याच्या पर्यटन विभागानेही येथील पर्यटनस्थळांच्या प्रसिद्धीत कुठली कसर सोडलेली नाही. देश-विदेशात केरळमधील अनेक पर्यटनस्थळांची महती पसरली आहे. शिवाय, पर्यटन संस्कृती वाढीस लागल्यामुळे तेथे भेट देणारा पर्यटक इतरांनाही तेथे जाण्यास उद्युक्त करतो. परिणामी देश- विदेशातील पर्यटकांचा केरळमध्ये ओघ वाढतच चालला आहे. समुद्रकिनारे, पाणथळ, ‘वैकुंठाष्टमी’ सारख्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा, वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ ही केरळची शक्तिस्थळे आहेत. प्राचीन ग्रामीण भारत कसा होता, याचाही अनुभव या राज्यात पर्यटकांना घेता येतो. त्यामुळे न्यूयॉर्क टाईम्सच्या यादीत केरळ स्थान मिळवू शकले. या वृत्तपत्राने कुमारकम आणि मरवांतुरुथ या स्थळांचा विशेष उल्लेख केला आहे.

न्यूयॉर्क टाईम्सची ‘टॉप टेन’ यादी

१. लंडन
२. मोरिओका (जपान)
३. शिल्पांचे खोरे नवाजो
ट्रायबल पार्क (अमेरिका)
४. किमार्टिन ग्लेन (स्कॉटलंड)
५. ऑकलंड (न्यूझीलंड)
६. पाम स्प्रिंग्स (कॅलिफोर्निया)
७. कांगारू बेट (ऑस्ट्रेलिया)
८. जोसा नदी (अल्बानिया)
९. त्रोम्सो (नॉर्वे)
१०. अॅक्रा (घाना)

Back to top button