Philippines : कांदा महाग, कोंबडी स्वस्त; तस्करी वाढली, वाढली गस्त | पुढारी

Philippines : कांदा महाग, कोंबडी स्वस्त; तस्करी वाढली, वाढली गस्त

मनिला : वृत्तसंस्था : फिलिपाईन्समध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. कोंबडीच्या दरांवरही कांद्याच्या दरांनी कडी केली आहे. कांद्याचे दर चिकनपेक्षा तब्बल तिप्पट झाले आहेत. एक किलो चिकनचा दर ३२५ रुपये, तर १ किलो कांद्याचा दर ९०० रुपयांवर गेला आहे. त्यामुळे कांद्याची तस्करीही सुरू झाली आहे.

कस्टमच्या अधिकाऱ्यांनीही गस्त वाढविली असून, दोन दिवसांपूर्वी ३ कोटी रुपयांचा कांदा जप्त करण्यात आला होता. चीनमधून हा कांदा लपवून आणला जात असल्याचे समोर आले आहे. याआधी डिसेंबरमध्येही कस्टम अधिकाऱ्यांनी २.५ कोटी रुपयांचा कांदा जप्त केला होता. खासदार शेर्विन विन यांनी कांदा तस्करीविरोधात टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे राष्ट्राध्यक्षांनी २१ हजार मेट्रिक टन कांदा आयातीला मंजुरी दिली आहे. मात्र हा कांदा २७ जानेवारीपर्यंत येथे पोहोचणार आहे. देशातील कांदा काढणी फेब्रुवारीत सुरू होणार आहे.

फेब्रुवारीनंतर कांदाटंचाई दूर होईल. कस्टमने जप्त केलेला कांदा नष्ट न करता स्वस्त दरात विकण्याबाबत सरकार विचार करत आहेत.
– फर्डिनान्ड मार्कोस ज्युनियर, राष्ट्राध्यक्ष, फिलिपाईन्स

Back to top button