पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य-उत्तर इस्रायलमधील लष्करी तळावर हिजबुल्लाहने केलेल्या ड्रोन हल्ल्यात चार सैनिक ठार झाले आणि ६० हून अधिक जखमी झाले आहेत, अशी माहिती इस्रायलच्याने सैन्य दलाने दिली आहे.
इस्रायली सैन्य दलाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य-उत्तर इस्रायलमधील लष्करी तळावर हिजबुल्लाहच्या ड्रोन हल्ल्यात चार इस्रायली सैनिक ठार झाले आणि 60 हून अधिक जखमी झाले. रविवारी उशिरा झालेला हा हल्ला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये युद्ध सुरू झाल्यापासूनच्या सर्वात प्राणघातक हल्ल्यांपैकी एक ठरली आहे.
इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने म्हटलं आहे की, हिजबुल्लाहने प्रक्षेपित केलेल्या मानवरहित हवाई वाहनाने (यूएव्ही) तेल अवीवच्या उत्तरेस ४० मैलांवर आणि लेबनीज सीमेजवळ असलेल्या बिन्यामिना शहराजवळील तळावर हल्ला केला. इराण समर्थित दहशतवादी गट हिजबुल्लाहने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, लेबनॉनमध्ये गुरुवारी इस्त्रायली हवाई हल्ल्याचा बदला म्हणून ड्रोन हल्ला करण्यात आला, ज्यात २२ नागरिक ठार झाले होते तर ११७ जखमी झाले आहे.
हिजबुल्लाह गटाने म्हटले आहे की, हा हल्ला विशेषतः इस्त्रायली सैन्यदलाच्या गोलानी ब्रिगेडला लक्ष्य करण्यासाठी केला होता. हिजबुल्लाहने म्हाेरक्या हसन नसराल्लाह यांचा एक संदेश जारी केला, ज्याने कारवाईची मागणी केली. आपल्या सदस्यांना त्याने म्हटलं की, “तुमचे लोक, तुमचे कुटुंब, तुमचे राष्ट्र, तुमची मूल्ये आणि तुमच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्याचे आवाहन केले,” सीएनएनने वृत्त दिले.
हिजबुल्लाहचे ड्रोन इस्रायली हवाई क्षेत्रात कसे घुसू शकले, याबाबत प्रश्न कायम आहेत. इस्त्रायली हवाई संरक्षण प्रणालीची उच्च विश्वासार्हता असूनही, हल्ल्यादरम्यान बिनयामिना परिसरात अलर्टचे कोणतेही अहवाल नाहीत. ड्रोन पुढे जात असताना इस्त्रायलच्या संरक्षण यंत्रणांना गुंतवण्यासाठी वळवून उत्तर इस्रायली शहरांकडे रॉकेट डागल्याचा दावा हिजबुल्लाने केला आहे. इस्त्रायलच्या सैन्य दलाचे मुख्य प्रवक्ते, रिअर एडम डॅनियल हगरी यांनी सांगितले की, लष्कर या घटनेची चौकशी करेल. "आम्ही या घटनेचा तपास करू."