बीजिंगमध्ये 14 लाख लोकांना तुरुंगात डांबले | पुढारी

बीजिंगमध्ये 14 लाख लोकांना तुरुंगात डांबले

बीजिंग : राष्ट्राध्यक्ष म्हणून तिसरा कार्यकाळ सुरू करण्यापूर्वी शी जिनपिंग यांना जनतेच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागतो आहे. बहुसंख्य जनता जिनपिंग यांच्या विरोधात आहे. विरोध मोडून काढण्यासाठी जिनपिंग यांनी दमनचक्र सुरू केले असून, एकट्या बीजिंगमध्ये 14 लाख लोकांना तुरुंगात डांबले आहे.

फ्लायओव्हर आदींवर जिनपिंगविरोधात फलके झळकविण्यापासून या विरोधाला सुरुवात झाली. पोलिसांनी फलके हटविली, काहींना तुरुंगात डांबले; पण विरोधाची धार बोथट होण्याऐवजी तीव्र होत गेली. लोक जिनपिंगविरोधात थेट रस्त्यावर उतरू लागले. एकट्या राजधानी बीजिंगमध्ये अशा 14 लाख निदर्शकांना तुरुंगात डांबण्यात आले आहे. या सर्वांविरुद्ध चोरी, हाणामारी आदी गुन्हेगारी स्वरूपाची कलमे लावण्यात आली आहेत.

कोरोना लॉकडाऊन तसेच निर्बंधक नियमावलीचाही जिनपिंग विरोधकांच्या विरोधात वापर केला जात आहे. चिनी सोशल मीडियावर जिनपिंग यांच्या विरोधातील पोस्ट सेंसर केल्या जात आहेत. बीजिंगसह विविध शहरांतून जिनपिंगविरोधात संप पुकारण्याचे आवाहन करणारी फलके झळकत आहेत. झिरो कोरोना धोरण संपुष्टात आणा, कम्युनिस्ट पक्षाचे नेते शी जिनपिंग यांची सत्ता उखडून फेका, अशी आवाहने खुलेआम केली जात आहेत. राजकीय विरोध ही तशी चीनमध्ये दुर्मीळ बाब आहे. याउपर या आठवड्यातच होऊ घातलेल्या कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस हाय अलर्टवर आहेत.

बंड शमविण्यासाठी लॉकडाऊन

प्राप्त माहितीनुसार जिनपिंग यांच्या विरोधातील बंड शमविण्यासाठीच्या धोरणांचा एक भाग म्हणून कोरोनाच्या नावाखाली अनेक शहरांमध्ये पूर्ववत लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. प्रवासावर निर्बंध लादले आहेत. शाळा-महाविद्यालये बंद केली आहेत.

16 ऑक्टोबरपासून तिसरा कार्यकाळ

एकीकडे जगभरातील देशांत कोरोना रुग्णसंख्या रोडावत असताना चीनमध्ये रुग्णसंख्या कशी वाढते आहे, याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. जिनपिंग यांच्या हेतूवरच शंका घेतली जात आहे. राष्ट्राध्यक्ष म्हणून जिनपिंग यांचा कार्यकाळ या महिन्यातच संपणार आहे. 16 ऑक्टोबर रोजी चिनी कम्युनिस्ट पक्षाची बैठक होणार असून, त्यामध्ये आगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून जिनपिंग यांच्या तिसर्‍या कार्यकाळावर शिक्कामोर्तब होणार आहे.

Back to top button