10 मुले जन्माला घाला, 13 लाख रुपये मिळवा; व्लादिमीर पुतीन यांची घोषणा | पुढारी

10 मुले जन्माला घाला, 13 लाख रुपये मिळवा; व्लादिमीर पुतीन यांची घोषणा

मॉस्को वृत्तसंस्था : रशियाची लोकसंख्या घटत चालल्या कारणाने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे चिंतित आहेत. या संकटावर उपाय म्हणून त्यांनी महिलांना दहा मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. अशा महिलांना 1 अब्ज रूबल म्हणजे 13 लाख रुपये दिले जाणार आहेत.

दरम्यान,व्लादिमीर पुतीन यांच्या या अजब निर्णयावर राजकीय नेते आणि सुरक्षातज्ज्ञ डॉ. जेनी मॅथर्स यांनी टीका केली आहे. रशियाची लोकसंख्या घटत आहे, हे खरे असले, तरी पुतीन यांनी घेतलेला निर्णय हताश करणारा आहे. केवळ 13 लाख रुपयांत 10 मुलांचे पालनपोषण कसे शक्य आहे? या सर्वांना ठेवायचे कुठे? रशियात अनेक आर्थिक, सामाजिक आणि राजकीय समस्या आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

रशिया-युक्रेन युद्धामुळेही परिस्थिती कठीण झाली आहे. एका अंदाजानुसार युक्रेन युद्धातच आतापर्यंत 50 हजार रशियनांचा मृत्यू झाला आहे. त्यापूर्वी कोरोना महारोगराईमुळे अनेकांचा जीव गेला होता. सध्या रशियाची लोकसंख्या 14 कोटी 60 लाख इतकी आहे.

10 मुले जन्माला घालणार्‍या महिलेस मदर हीरोईन पुरस्कार

10 मुले जन्माला घालणार्‍या महिलेस ‘मदर हीरोईन’ नावाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. दुसर्‍या महायुद्ध काळात रशियन महिलांना हा पुरस्कार दिला जात होता. त्या काळातही रशियाच्या लोकसंख्येत वेगाने घट होत होती. दरम्यान, 1991 मध्ये सोव्हियत महासंघाचे पतन झाल्यानंतर रशियाने हा पुरस्कार देणे बंद केले होते. पुतीन यांनी हा पुरस्कार पुन्हा सुरू केला आहे.

दहाव्या अपत्याच्या जन्मानंतर मिळणार पैसे

व्लादिमीर पुतीन यांनी 15 ऑगस्ट रोजी एक आदेश जारी केला होता. त्यानुसार दहाव्या अपत्याच्या पहिल्या वाढदिनी महिलांना 13 लाखांची रक्कम एकत्रित दिली जाणार आहे. ही रक्कम महिलांच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल. काही कारणास्तव मुलाचा मृत्यू झाला, तरीदेखील ही रक्कम दिली जाईल.

हेही वाचा

Back to top button