ज्यो बायडेन म्हणाले ड्रोन स्ट्राईक शेवटचा समजू नका | पुढारी

ज्यो बायडेन म्हणाले ड्रोन स्ट्राईक शेवटचा समजू नका

वॉशिंग्टन ; वृत्तसंस्था : काबूलमधील आत्मघाती हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून आम्ही केलेला ड्रोन स्ट्राईक अखेरचा समजू नका, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इसिस-खुरासान या दहशतवादी गटाला दिला आहे.

काबूल हल्ल्यामागील मास्टरमाईंडला अमेरिकेने शुक्रवारी रात्री ड्रोन हल्ल्याद्वारे टिपत आपला बदला घेतला. त्या पार्श्वभूमीवर बोलताना बायडेन यांनी हा इशारा दिला.

अफगाणिस्तानातील सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करीत ज्यो बायडेन म्हणाले की, आमचे सैनिक आणि नागरिकांवर हल्ला करणार्‍यांना सोडणार नाही, असे मी म्हटले होते. ते खरे करून दाखविले.

काबूलमधील आत्मघाती हल्ल्यानंतर दहशवाद्यांवर केलेला ड्रोन हल्ला शेवटचा समजू नका. आमचे सैनिक आणि नागरिक यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षा दिली जाईल, अमेरिकी सैन्यावर हल्ला करणार्‍यांना जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असेही बायडेन यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, काबूलमधील आत्मघाती हल्ल्यात ठार झालेल्यांना बायडेन यांनी श्रद्धांजली वाहिली.

तालिबानची सत्ता जास्त काळ टिकणार नाही

तालिबानची राजवट जास्त काळ टिकणार नाही, असा विश्वास पंजशीर प्रांतात तालिबान्यांशी दोन हात करणारे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी व्यक्त केला आहे. तालिबान्यांचे कायदे अफगाणी नागरिकांना नको आहेत. कोणत्या एका गटाने देशाचे नेतृत्व करावे, हेही त्यांना मान्य नाही. पंजशीरप्रमाणे इतर काही प्रांतातून तालिबानला विरोध वाढत असल्याने तालिबानला जास्त काळ सत्ता टिकविता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Back to top button