चीनचे हेरगिरी जहाज श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात दाखल, भारताने घेतला तीव्र आक्षेप

Chinese research vessel Yuan Wang 5 (Photo credit : Daily Mirror)

कोलंबो; पुढारी ऑनलाईन : चीनचे हेरगिरी करणारे जहाज आज मंगळवारी श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात पोहोचले असल्याचे वृत्त श्रीलंकेतील डेली मिररने (Sri Lanka’s Daily Mirror) दिले आहे. भारत, अमेरिकेकडून या जहाजाबाबत करण्यात आलेल्या विरोधाला न जुमानता चीनचे हे जहाज श्रीलंकेत दाखल झाले आहे. युआन वांग -५ – (Yuan Wang 5) या जहाजाला श्रीलंकेच्या बंदरात येण्याची परवानगी देण्यात आली होती. या जहाजापासून भारतीय नौदल आणि इस्रोला धोका असल्याचे सांगितले जात आहे. १६ ते २२ ऑगस्ट दरम्यान या जहाजाला हंबनटोटा बंदरात मुक्काम करण्यासाठी श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने १३ ऑगस्ट रोजी परवानगी दिली होती.

श्रीलंकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “सर्व गोष्टींचा विचार करून चीनच्या जहाजाला १६ ते २२ ऑगस्ट दरम्यान मुक्कामी येण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती.”. युआन वांग-५ हे उपग्रह आणि क्षेपणास्त्र ट्रॅकिंग जहाज आहे. भारताने याला विरोध दर्शवल्यानंतर श्रीलंकेने याआधी चीनला जहाजाचा प्रवेश लांबणीवर टाकण्यास सांगितले होते. पण यानंतर चीनकडून तीव्र प्रतिक्रिया आली होती. चीनने या महिन्याच्या सुरुवातीला म्हटले होते की, श्रीलंकेवर दबाव आणण्यासाठी काही देश सुरक्षेबाबत चिंतेचे कारण पुढे करत आहेत. त्याच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केला जात आहे. त्यानंतर श्रीलंकेने १३ ऑगस्ट रोजी या जहाजाला बंदरात प्रवेश देण्यास परवानगी दिली.

युआन वांग ५ हे एक संशोधन जहाज आहे. त्याला सुरक्षा विश्लेषकांनी गुप्तहेर जहाज म्हटले आहे. अमेरिकेनेही चीनच्या जहाजाच्या पाळत ठेवण्याच्या क्षमतेमुळे चिंता व्यक्त केली होती. भारत, अमेरिका आणि चीन यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर बंदर अधिकाऱ्यांनी सांगितले की, श्रीलंकेच्या पाण्यात असताना ते कोणतेही संशोधन करणार नाहीत या अटीवर या जहाजाला बंदरात प्रवेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, भारताने चीनच्या धमक्या आणि इशाऱ्यांना न जुमानता देशाच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेऊ असे सुनावले होते.

चीनने श्रीलंकेतील पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. यामुळे श्रीलंका चीनच्या कर्जाने ओझ्याने आर्थिक संकटात सापडला आहे. दुसरीकडे सध्या सुरू असलेल्या आर्थिक संकटात भारताने श्रीलंकेला मदतीचा हात दिला आहे. भारताने वर्षभरात श्रीलंकेला सुमारे ४ अब्ज डॉलरची आर्थिक मदत केली आहे.

Exit mobile version