तालिबानी सत्तेच्या एक वर्षात 2,106 लोकांची हत्या; मुलींच्या वाट्याला उपेक्षित जीणे | पुढारी

तालिबानी सत्तेच्या एक वर्षात 2,106 लोकांची हत्या; मुलींच्या वाट्याला उपेक्षित जीणे

काबूल; वृत्तसंस्था : अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. सन 2001 मध्ये अमेरिकेने तालिबानला सत्तेवरून खाली खेचले होते. अफगाणिस्तानात नव्या सरकारची स्थापना केली होती, पण अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर अशरफ घनी सरकार उलथवून टाकून 15 ऑगस्ट 2021 रोजी काबुलवर तालिबानने ताबा मिळविला होता.

अफगाणिस्तानातील परिस्थिती या एका वर्षात रसातळाला गेली आहे. अफगाणिस्तानातील 80 टक्के कुटुंबातील मुलांची अन्नान्नदशा आहे. मुलांना एकचवेळचे जेवण कसेबेसे मिळत आहे. मुलींना मुलांपेक्षा कमी खायला दिले जाते, असे एका पाहणीत दिसून आले आहे. अर्थव्यवस्थाही डबघाईला आली आहे. मुलींचे शिक्षण अधांतरी आहे. वर्षभरात 5 लाख लोकांनी अफगाणिस्तानातून पलायन केले आहे. पाकिस्तानात असलेल्या अफगाण नागरिकांना अद्यापही निर्वासितांचा दर्जा मिळालेला नाही.

तालिबान राजवटीच्या वर्षभरात 2,106 लोक मारले गेले आहेत. यातील बहुतांश हत्या काबूल आणि मजार-ए-शरीफमध्ये झाल्या आहेत. महिला पत्रकारांना बंदी असून, तालिबान सरकारने आजवर 122 पत्रकारांविरुद्ध अटकेची कारवाई केली आहे. अफगाणिस्तानात मानवाधिकारांचे उल्लंघन होत असल्याने अमेरिकेने या देशाचा सुमारे 56 हजार कोटी रुपयांचा निधी गोठवला आहे. अफगाणिस्तान सेंट्रल बँकेचा हा निधी यूएस फेडरल रिझर्व्हमध्ये जमा केला जातो.

अल कायदा पुन्हा हल्ला करणार?

अल-कायदाचा जवाहिरी काबुलमध्ये ‘सीआए’करवी मारला गेल्यानंतर सैफ अल-अदेल सक्रिय झाला आहे. सैफ हा सध्या इराणमध्ये आश्रयाला आहे. तालिबान सरकारने अजूनही अल-कायदाला पाठबळ देणे बंद केलेले नाही, अशी माहिती अमेरिकेकडे आहे. अल-कायदा पुन्हा अमेरिकेवर हल्ला करू शकते, अशी भीती अमेरिकेला आहे.

Back to top button