भारतात हेरगिरी करण्यासाठी चिनी जहाज 11 रोजी श्रीलंकेत | पुढारी

भारतात हेरगिरी करण्यासाठी चिनी जहाज 11 रोजी श्रीलंकेत

कोलंबो; वृत्तसंस्था : चीनचे गुप्तचर जहाज ‘युआन वांग-5’ श्रीलंकेतील हंबनटोटा 11 ऑगस्ट रोजी बंदरात पोहोचण्याची शक्यता आहे. या जहाजाचा वेग ताशी 35 किलोमीटर आहे. भारताने या जहाजाविरोधात श्रीलंकेकडे आपला निषेध नोंदवला आहे. याउपर श्रीलंकेने या जहाजाला परवानगी नाकारलेली नाही. भारतही सतर्क झाला आहे. भारतीय नौदल या जहाजावर नजर ठेवून आहे.

किती दिवस राहणार? हेतू काय?

हे जहाज हंबनटोटामध्ये आठवडाभर राहील. चीनने हंबनटोटा हे बंदर श्रीलंकेकडून 99 वर्षांच्या लीजवर घेतलेले आहे. म्हणायला युआन वांग-5 जहाज चिनी उपग्रहांना ट्रॅक करून त्यावर संशोधन करणार आहे; पण त्याचा खरा हेतू भारतातील माहिती गोळा करणे हाच आहे. हे जहाज 750 किलोमीटरपर्यंत टेहळणी करू शकते. पॅराबॉलिक ट्रॅकिंग अँटेना आणि अनेक प्रकारच्या सेन्सर्सनी ते सज्ज आहे.

भारताला हा धोका

दक्षिण भारतातील कल्पक्कम, कुडनकुलम ही प्रमुख लष्करी आणि आण्विक तळे टप्प्यात येतील. केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील अनेक बंदरे चीनच्या रडारवर असतील. भारताच्या मुख्य नौदल तळ आणि अणू प्रकल्पांची हेरगिरी करता येईल.

Back to top button