अमेरिकी शस्त्र खजिना तालिबान्यांच्या हाती | पुढारी

अमेरिकी शस्त्र खजिना तालिबान्यांच्या हाती

वॉशिंग्टन ः वृत्तसंस्था

अफगाणिस्तान ताब्यात घेतलेल्या तालिबान्यांच्या हाती अमेरिकी शस्त्र खजिना आणि उपकरणांचे आयते घबाड लागले आहे. यामुळे निश्चितपणे तालिबानची ताकद वाढली आहे. अफगाणिस्तानच्या सैन्याने सोडलेली सुमारे दोन हजार चिलखती वाहने, 40 विमाने आणि हेलिकॉप्टर्स तसेच ड्रोन, नाईट व्हिजन गॉगल्स यांसारख्या अन्य उपकरणांचा समावेश आहे. अमेरिकी सिनेटर्स तसेच संरक्षण दलांतील वरिष्ठ अधिकार्‍यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

महिनाभरापूर्वी अफगाणिस्तानच्या ताफ्यात अमेरिकेकडून 7 नवीन हेलिकॉप्टर दाखल करण्यात आली होती. त्याची छायाचित्रे अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच तालिबानने अवघा देश ताब्यात घेतला. पळ काढणार्‍या अफगाणी सैन्याने मागे सोडलेली यूएस एमव्हीसारखी 2 हजार चिलखती वाहने, यूएच-60 ब्लॅक हॉक, स्काऊट अ‍ॅटॅक हेलिकॉप्टर्ससमवेत 40 लढाऊ विमाने, स्कॅन इगल मिलिट्री ड्रोन नाईट व्हिजन गॉगल्ससारखी अन्य उपकरणे असा खजिनाच आता तालिबानच्या हाती लागला आहे. त्याची पाहणी करणार्‍या तालिबानी दहशतवाद्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्याचा दाखला देत अमेरिकी लष्करातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने जे काही अफगाणिस्तानात सुटले, ते सर्व तालिबान्यांचे आहे, अशी खंत व्यक्त केली.

तालिबान्यांच्या हातात प्रथमच आम्ही अमेरिकी शस्त्रे पाहात असून हे अमेरिकेसह सहयोगी देशांसाठीही घातक असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे खासदार मायकल मैक्कॉल यांनी व्यक्त केले.

तंत्रज्ञान दुसर्‍याच्या हाती लागण्याची भीती

तालिबानच्या हाती लागलेल्या आधुनिक शस्त्रांचे तंत्रज्ञान इसिस या दहशतवादी संघटनेसमवेत रशिया, चीनसारख्या अमेरिकाविरोधी
देशांच्या हाती लागण्याची दाट शक्यता असून त्याचा वापर भविष्यात अमेरिकेविरोधात होऊ शकतो, अशी चिंता अमेरिकी लष्करातील आजी-माजी अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे.

अमेरिकेने आतापर्यंत काय काय दिले

अमेरिकेने 2017 पर्यंत अफगाणिस्तानला तब्बल 28 अब्ज डॉलरची शस्त्रे आणि आधुनिक उपकरणे दिली होती. यात 208 विमाने, हेलिकॉप्टर्ससह गन, रॉकेट, ड्रोन, 16 हजार नाईट व्हिजन गॉगल, 1 लाख 62 हजार कम्युनिकेशनशी संबंधित उपकरणे, एम-16 असॉल्ट रायफल, मोर्टार, हॉवित्झर तोफांसारखी 6 लाख इन्फंट्री शस्त्रांचा यात समावेश आहे.

बायडेन यांच्यासमोर आता हा पर्याय

लष्करी अधिकार्‍यांच्या मते, तालिबानच्या हाती लागलेली विमाने, हेलिकॉप्टर हवाई हल्ल्याद्वारे नष्ट करण्याचा पर्याय अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांच्या हाती आहे. मात्र, यामुळे तालिबान भडकण्याची शक्यता असून तेथे अडकलेल्या अमेरिकी नागरिकांना बाहेर काढण्यास अमेरिकेचे प्राधान्य आहे.

Back to top button