Sharia Law : अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात : जाचक इस्लामी शरिया कायदा नेमका आहे तरी काय? | पुढारी

Sharia Law : अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात : जाचक इस्लामी शरिया कायदा नेमका आहे तरी काय?

पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तान आणि तालिबान, हा जिकडे-तिकडे चर्चेचा विषय झालेला आहे. तालिबान खरंतर महिलांवरील अत्याचारांसाठी कुप्रसिद्ध आहेत. २००१ पर्यंत महिलांवर लादलेले निर्बंध जागतिक चर्चेचा विषय आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महिलांवर कठोर आणि अन्यायकारक असणारा ‘शरिया कायदा’ (Sharia Law) लादला जाणार असल्याने महिला भीतीच्या छायेखाली आहेत.

आता पुन्हा तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर आपल्या वर्चस्वाचा झेंडा रोवला आहे. त्यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. त्यात सांगितलं की, “महिलांना शरिया कायद्याचा चौकटीत शिक्षण आणि नोकरी करता येईल.” असं असलं तरी, त्याची अंमलबजावणी कशी केली जाते, यावर महिलांचं भवितव्य अवलंबून आहे. या घडामोडीच्या मूळात ‘शरिया कायदा’ (Sharia Law) आहे. तो पुन्हा एका समजून घ्यायला पाहिजे. चला तर, तो कायदा नेमका काय आहे, ते पाहू या…

sharia law

मुस्लिम धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कुराण आणि प्रेषित मोहम्मद यांचे विचार असलेल्या सुन्ना आणि हदीस, यामधून शरिया कायद्याची निर्मिती झाली. मुस्लिम देशांमध्ये त्याचं पालन केलं जातं, तर काही देशांमध्ये केलं जात नाही. आधुनिक विचारांच्या मुस्लिमांकडून त्याचा काळानुसरा अर्थ लावला जातो, तर काही कट्टरतावादी मुस्लिमांकडून जुन्याच शरिया कायद्याची अंमलबजावणी केली जाते. त्यातच महिलांवर अत्याचार होत राहतात.

‘शरिया कायद्या’मध्ये काय आहे?

शरिया शब्द म्हणजे ‘स्पष्ट आणि स्वच्छ आखून दिलेला रस्ता’. या शरियामध्ये मार्गदर्शक तत्वं दिलेली आहेत. त्यानुसार धर्मगुरू नियम तयार करतात. म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीबाबतीत नेमकं कसं वागायचं, हे सांगितलेलं असतं. नियम तयार केल्यानंतर फतवे काढले जातात. एखाद्या घटनेसंदर्भात निकाल दिले जातात.

दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टींसंदर्भात यामध्ये नियम करण्यात आलेले आहेत. माणसानं कसं वागायचं, कसं राहायचं, व्यवसायक कसा करायचा, प्रार्थना कशी करायची, उपवास कसा करायचा, गरिबांना दान कधी आणि कसं करायचं, या सर्व बाबतीतील नियम शरियामध्ये देण्यात आले आहेत. हे नियम मुस्लिमांनी पाळणं बंधनकारक आहे. यासंदर्भात काय विचारायचं असेल धर्मगुरूकडे जायचं.

sharia law

शरिया कायद्यात गुन्हा कसा ठरतो? 

या कायद्यानुसार गुन्हा दोन प्रकारचा ठरतो. पहिला प्रकाराला ‘हद्द’ असं म्हणतात. या प्रकार खूप डेंजरस आहेत. हद्द म्हणजे गंभीर गुन्हा समजला जातो. त्यात चोरी आणि व्याभिचाराचा समावेश होतो. यामध्ये गुन्हा सिद्ध झाला की, सरळ हात तोडण्याची शिक्षा मिळते, अशी तरदूतच या शरिया कायद्यात (Sharia Law) आहे. काही देशांत याची कठोर अंमलबजावणी केली जाते.

दुसरा गुन्ह्याचा प्रकार आहे तो म्हणजे ‘तझीर’. हा किरकोळ गुन्ह्यांसाठी आहे. यासंदर्भात स्थानिक धर्मगुरू आणि धर्मपीठाकडून शिक्षा दिली जाते. शरिया कायद्याची हनबली, मलिकी, शाफी आणि हनफी, नावाचे चार मार्गदर्शक तत्वाच्या शाखा आहेत. या चार शाखा सुन्नी पंथीयांच्या आहेत.

तर, शिया जाफरी ही शाखा शिया पंथीयांची आहे. या पाच शाखांद्वारे शरिया कायदा समजून घेतला जातो. त्याच्या जोरावरच वेगवेगळे फतवे काढले जातात. तोच मुस्लिमांसाठी अधिकृत कायदा मानला जातो. या मार्गदर्शक तत्वांद्वारेच नियमांची आणि शिक्षेची अंमलबजावणी केली जाते. किंवा एखाद्या गुन्ह्याचा निकाल दिला जातो.

sharia law

महिलांसाठी शरिया कायद्याचे नियम काय होते? 

 • महिलांना बाहेर जायचा असेल, तर बुरखा घालणं बंधनकारक आहे. इतकंच नाही तर कोणत्यातरी नातेवाईकाला सोबत घेऊनच बाहेर पडायचं.
 • महिला चालत असताना पुरूषांना त्याचा आवाज येऊ नये म्हणून महिलांना उंच टाचेची सॅन्डल्स घालण्यावर बंदी आहे.
 • सार्वजनिक ठिकाणी अनोळखी लोकांसमोर महिलांचा आवाज येता कामा नये.
 • घरातील महिलांना कोणी पाहू नये, यासाठी घराला जाळीदार खिडक्या म्हणजेत पारदर्शक खिडक्या असू नयेत. तसेच त्या खिडक्यांना रंग दिलेला असला पाहिजे.
 • महिलांनी फोटो काढायचे नाहीत. तसेच कोणत्याही महिलेला तिचा फोटो कुठंही प्रकाशित करता येणार नाही. घरातही तिचा फोटो लावता येणार नाही.
 • कोणत्याही ठिकाणाला महिलांचे नाव असेल, तर त्वरीत ते नाव काढून टाकावे.
 • बाल्कनीत किंवा खिडकीत महिलांनी उभं राहू नये. जेणे करून त्या बाहेरच्या व्यक्तीला दिसता कामा नयेत.
 • सार्वजनिक कार्यक्रमात महिलांना भाग घेता येणार नाही. त्याचबरोबर नेलपेंट आणि स्वच्छेने लग्नही महिलांना करता येणार नाही.

तालिबान्यांनी महिलांना कशा शिक्षा दिल्या?

 • एखादी महिला व्याभिचाराच्या गुन्ह्यात सापडली, तर तिला सार्वजनिक ठिकाणी तालिबानी शिक्षा देतात. ही शिक्षा हात तोडण्याची असते.
 • तोकडे कपडे जर एखाद्या महिलेने घातले, तर तिला सार्वजनिक ठिकाणी तालिबान्यांनी मारण्याची शिक्षा दिलेली आहे.
 • समजा एखाद्या मुलीने ठरवलेल्या ठिकाणी लग्न करण्याचं नाकारलं आणि दुसऱ्या कोणत्यातरी मुलासोबत पळून जाण्याचा विचार केला, तर त्या मुलीचं नाक आणि कान कापले जातात. नेलपेंट लावले तर बोटं कापली जातात.

Back to top button