अफगाणिस्तान : तालिबानचा कब्जा; मलाला युसूफझई काय म्हणाली? | पुढारी

अफगाणिस्तान : तालिबानचा कब्जा; मलाला युसूफझई काय म्हणाली?

पुढारी ऑनलाईन डेस्क; तालिबाननं संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. अफगाणिस्तानमधील या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर शांततेचं नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला युसूफझई हिने ट्विट केले आहे. मलाला हिने ट्विटमधून महिला, अल्पसंख्यांक आणि मानवी हक्कांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

”तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा केल्याचे पाहून आम्हाला धक्का बसला. मी महिला, अल्पसंख्यांक आणि मानवी हक्कांबाबत खूप चिंतित आहे. जागतिक, प्रादेशिक आणि स्थानिक शक्तींनी तातडीने युद्धबंदीची मागणी केली पाहिजे. तातडीने मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत दिली पाहिजे आणि निर्वासित आणि नागरिकांचे संरक्षण करायला हवे,” असे मलालाने ट्विटमध्ये म्हटले आहे.

मलालाचा जन्म १२ जुलै १९९७ मध्ये पाकिस्तानात झाला. तिला वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तिने लहान वयापासूनच महिलांसाठी आवाज उठवण्यास सुरुवात केली.

तसेच मुलींच्या शिक्षणासाठी अभियान सुरु केले होते. पण तालिबान्यांनी मलालाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या होत्या. मात्र, चांगले उपचार मिळाल्याने मलालाला जीवनदान मिळाले. आता तिने अफगाणिस्तानमधील संघर्षावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा केल्यानंतर काबूल शहरातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. अफगाणिस्तानातून पलायन करण्यासाठी काबूल विमानतळावर नागरिकांची मोठी गर्दी उसळली आहे.

येथे गोळीबार झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, तालिबानने अफगाणिस्तानातील युद्ध संपल्याचे जाहीर करत शासन व्यवस्थेबाबत लवकरच माहिती देणार असल्याचे म्हटले आहे.

गोळीबारानंतर काबूल विमानतळावर मोठा गोंधळ उडाला आहे. लोक आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत आहेत.

यात अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत काबूल विमानतळावरील परिस्थिती भयावह दिसून येत आहे.

तालिबानने अफगाणिस्तानातील बहुतांश शहरांवर कब्जा केला आहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घणी देश सोडून पळून गेले आहेत. ते उझबेकिस्तानला गेले असल्याचे समजते.

हे ही वाचा :

Back to top button