चीन लॉकडाऊन : प्रशासनाची पुन्हा वुहान रणनीती | पुढारी

चीन लॉकडाऊन : प्रशासनाची पुन्हा वुहान रणनीती

पुढारी ऑनलाईन डेस्क

चीनमध्ये कोरोनाचा डेल्टा व्हेरियंट पुन्हा धुमकूळ घालत आहे. त्यामुळे चीन लॉकडाऊन करण्याच्या दिशने प्रशासन मोठी पावले उचलत आहे. या कारवाईचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत चिनी प्रशासन नागरिकांच्या घराबाहेर मोठे मोठे लोखंडी रॉड लावून त्यांना घराबाहेर पडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

पुन्हा वुहान स्ट्रॅटेजी

तैवान न्यूजमध्ये लेख लिहिणाऱ्या केओनी एव्हरिंगटन यांनी सांगितले की चीन लॉकडाऊन बाबत पुन्हा वुहान स्ट्रॅटेजी वापरत आहे. या बाबतचे अनेक व्हिडिओ वैबो, ट्विटर आणि युट्यूबवर शेअर होत आहेत. यात विषाणू प्रतिबंधक सूट घातलेले कर्मचारी लोकांच्या घराच्या दरवाजाला बाहेरुन मोठे लोखंडी रॉड लावत आहेत.

एका ट्विटरवील पोस्टमध्ये एक मनुष्य आपले क्वारंटाईन तोडून हवा खाण्यासाठी आपल्या अपार्टमेंटच्या बाहेर आल्याचे दिसत आहे. तर युट्यूबवर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओत दावा करण्यात आला आहे की एकाने आपल्या घराचा दरवाजा दिवसातून तीनवेळा उघडला. त्यांना प्रशासनाने सक्तीने त्यांच्या घरात लॉक केले.

पीपीई किट घातलेली लोकं मोठे लोखंडी बार घराच्या दरवाज्याला फिक्स करत असल्याचे दिसत आहे. याबाबतचे वृत्त तैवान न्यूजने दिले आहे.

चीन लॉकडाऊन : बाहेर पडला तर सक्तीने घर सील

वैबोवर पोस्ट झालेल्या अजून एका व्हिडिओमध्ये अनेक घरे बाहेरुन सक्तीने सील केली जात आहेत असे दिसते. हा व्हिडिओ नागरिकांमध्येही शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत ‘लोकांनी बाहेर पडू नये. जर ते बाहेर फिरताना सापडले तर त्यांच्या घराचे दरवाजे सक्तीने सील केले जातील.’ असेही जाहीर करण्यात येत आहे.

एका व्हिडिओत एक मुलगी तर तिचे घर बाहेरून सील करण्यापूर्वी त्या पीपीई किट घातलेल्या लोकांच्या समोर नृत्य करत होती. दरम्यान, ‘चीन ज्या गोष्टी तुम्हाला माहीत होऊ देत नाही’ या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

तर अपार्टमेंट तीन आठवडे सील 

त्या व्हिडिओत दावा करण्यात आला आहे की जर समजा एका अपार्टमेंटमध्ये कोणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला किंवा एखाद्या कोरोना बाधिताशी जवळून संपर्क आलेली व्यक्ती त्या अपार्टमेंटमध्ये असेल तर ती संपूर्ण अपार्टमेंट दोन ते तीन आठवड्यांसाठी सील केली जाते.

चीन लॉकडाऊन बाबत आता जे धोरण अवलंबत आहे त्या धोरणामुळे कोरोना महामारीची सुरुवात झालेल्या वुहानमधून पहिल्यांदा बाहेर पडलेल्या दृष्यांची आठवणी ताज्या होत आहेत.

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार ९ ऑगस्टला १७ राज्यात १४३ नवे कोरोना बाधित आढळून आले होते. यातील ३५ केसेस या विदेशातून आलेल्या तर १०८ केसेस या स्थानिक आहेत. जिंगसू प्रांतात ५० तर हेनान प्रांतात ३७, हुबेई प्रांतात १५, ह्युनान मध्ये ६ रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : विको प्रोडक्टवर माझा फोटो आता बदला; मृणाल कुलकर्णी

Back to top button