सावधान... मंकीपॉक्स येतोय... | पुढारी

सावधान... मंकीपॉक्स येतोय...

कोरोनाने संपूर्ण जगाला घातलेला विळखा हळूहळू सैलावत चाललेला असतानाच आता मंकीपॉक्स राेगाने चंचूप्रवेश केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जगातील ब्रिटन, अमेरिका, पोर्तुगाल, स्पेन, बेल्जियम, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, कॅनडा आणि इटली या देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले आहेत.

पहिले संक्रमण माकडामध्ये

मंकीपॉक्सचे सर्वात पहिले संक्रमण 1953 साली माकडामध्ये आढळून आले होते. तेव्हापासून या विषयावर जगभरातील शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. मनुष्यामध्ये मंकीपॉक्स या राेगाने शिरकाव केल्याचे पहिले प्रकरण आफ्रिका खंडातील काँगो प्रजासत्ताक या देशात 1970 मध्ये आढळून आले होते.

भारतात एकही रुग्ण नाही

सुदैवाने भारतात अजून मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही. तथापि, जागतिक पातळीवर या रुग्णांची हळूहळू वाढत चाललेली संख्या लक्षात घेऊन केंद्र सरकारनेही आता प्रतिबंधात्मक पावले उचलायला सुरुवात केली आहे.

कसा वाढतो संसर्ग?

संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. तसेच, संक्रमित प्राणीदेखील या विषाणूचे सक्रिय वाहक असू शकतात. अशा प्राण्याच्या संपर्कात आल्याने किंवा विषाणू-दूषित वस्तूंद्वारेही मंकीपॉक्स पसरू शकतो.

कोणती दक्षता घ्याल?

* विषाणू पसरवणार्‍या प्राण्यांशी संपर्क टाळा.
* आजारी जनावरांच्या संपर्कात येणं टाळा.
* संक्रमित रुग्णांना वेगळे ठेवा.
* हात वारंवार धुवा आणि स्वच्छ ठेवा.

मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून हालचालींना वेग

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन आंतरराष्ट्रीय विमानतळे, बंदरे आणि देशाच्या सीमाभागांत लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. तसेच आफ्रिकेतून येणार्‍या ज्या प्रवाशांमध्ये लक्षणे दिसून येतील त्यांचे नमुने पुढील तपासणीसाठी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे पाठवले जातील.

ज्यांच्यात काही लक्षणे आढळून येतील केवळ त्याच रुग्णांचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे पाठवण्यात येणार आहेत. केंद्र सरकारने नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांना युरोप व अन्य देशांतील ताज्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यास बजावले आहे. सुदैवाने भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही.

ब्रिटेनमध्ये वाढता प्रादुर्भाव

ब्रिटनच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या तिथे एकूण 20 रुग्णांना मंकीपॉक्सची लागण झाली आहे. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी फायदेशीर ठरणारी लस मिळवण्यासाठी ब्रिटन सरकारकडून जोमाने प्रयत्न करण्यात येत आहेत. मंकीपॉक्स हा देवी रोगासारखाच आजार आहे.

Back to top button