चिनी सैनिक हायस्पीड रेल्वेने अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ | पुढारी

चिनी सैनिक हायस्पीड रेल्वेने अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ

बीजिंग ; वृत्तसंस्था : भारत आणि चीनदरम्यान शांतता प्रस्थापित करण्याचे भारताचे प्रयत्न एका बाजूला सुरू असतानाच चीनने आपली तिरकी चाल मात्र कायम ठेवल्याचे दिसत आहे. चीनच्या सैन्याने लडाखमधील केलेल्या घुसखोरीची पुनरावृत्ती अरुणाचल प्रदेशमध्येही उघडपणे केल्याचे स्पष्ट झाले आहे. चिनी सैनिकांना हायस्पीड रेल्वेने अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ पाठवण्यात आले आहे.

चीनने अलीकडेच सुरू केलेल्या ल्हासा-नियिंगी हायस्पीड रेल्वेने चिनी सैन्याची तुकडी पाठवली आहे. पूर्व लडाखमधील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही देशांदरम्यान चर्चेची 12 वी फेरी नुकतीच पार पडली. त्यावेळी वादग्रस्त गोग्रा पॉईंटवरून सैन्य माघार घेण्याचे निश्‍चित झाले. त्यानुसार कार्यवाहीही करण्यात आली. अन्य वादग्रस्त भागाबाबत चर्चा होणार आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना अरुणाचल प्रदेशजवळ चीनने नुकतेच सैन्य पाठवले आहे. भारतीय सीमेजवळील गावात या लष्करी हालचाली सुरू आहेत. त्यामुळे भारताची डोकेदुखी वाढली आहे. अरुणाचल प्रदेशवर चीनने वारंवार आपला दावा सांगितला आहे. मात्र, तो भारताने सपशेल फेटाळून लावला आहे.

सैन्याच्या जलद हालचालीसाठी हायस्पीड रेल्वे

ल्हासा-नियिंगी रेल्वे ही सिच्युआन-तिबेट रेल्वेचा एक महत्त्वाचा भाग आहे. या रेल्वेने पहिल्यांदाच सैन्याची ही तुकडी दाखल झाली आहे. चीनच्या लष्करी वाहतुकीच्या पद्धतशीर विकासासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. हायस्पीड रेल्वे पीएलएच्या क्षमतेच्या विकासाचा भाग आहे. सीमेवरील दळणवळण वाढवण्याचा हा भाग असला तरी तिचा वापर सैन्याच्या जलद हालचालीसाठी करण्याचा प्रमुख हेतू आहे. या द‍ृष्टीने चीनने अरुणाचल सीमेवर धरण, रस्ते आणि हवाई नेटवर्क उभारण्याचे धोरण युद्धपातळीवर राबवले आहे. आता हायस्पीड रेल्वेने सैन्य पाठवून चीनने तणाव वाढविला आहे.

ट्रेनचा लष्करी कारवाईसाठी वापर

तिबेटची राजधानी ल्हासापर्यंत चीनने अलीकडेच सुरू केलेल्या हायस्पीड ट्रेनचा वापर चीन अशा लष्करी कारवायासाठी करीत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीशी (पीएलए) संलग्‍न असलेल्या तिबेट मिलिटरी कमांडची सशस्त्र तुकडी येथील 4,500 मीटर उंचीवर असलेल्या सरावाच्या ठिकाणी दाखल झाली असल्याचे चीनचे सरकारी प्रसार माध्यम असणार्‍या ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.

Back to top button