पुढारी; ऑनलाईन डेस्क : एलिझाबेथ बोर्न यांच्या रूपाने तब्बल तीस वर्षानंतर फ्रान्सला दुसरी महिला पंतप्रधान मिळाली आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी कामगार नेत्या एलिझाबेथ बॉर्न यांची देशाचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे. जीन कॅस्टेक्स यांनी राजीनामा दिल्यानंतर एलिझाबेथ बोर्न यांची पंतप्रधानपदी निवड झाली आहे. मागील सरकारमध्ये फ्रान्स सरकारमध्ये बोर्न या कामगार मंत्री होत्या. नवीन फ्रेंच सरकार नियुक्त करण्यासाठी मॅक्रॉन आणि त्यांचे नवे पंतप्रधान येत्या काही दिवसांत चर्चा करणार आहे.
पंतप्रधान पदाच्या निवडीनंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्यूएल मॅक्रॉन म्हणाले की, नवीन फ्रेंच सरकार हे शिक्षण, आरोग्य, रोजगार, पर्यावरण आणि लोकशाहीचे पुनरज्जीवन या घटकांवर प्रामुख्याने काम करेल. तसेच देशात अन्न आणि उर्जेच्या (तेल आणि वायू) किमती वाढत आहेत. त्यामुळे राहणीमानाच्या वाढत्या खर्चाबाबत विधेयक मांडण्याचे आश्वासनही त्यांनी यानिवडीवेळी दिले. येत्या काही दिवसांमध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन आणि एलिझाबेथ बोर्न हे मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यासाठी चर्चा करतील, असे फ्रान्स मीडियाने स्पष्ट केले आहे.
६१ वर्षीय बोर्न या मृदुभाषी नोकरशहा असून, त्या फ्रान्सच्या समाजवादी पार्टीत कार्यरत आहेत. पॅरिसमध्ये वाढलेल्या एलिझाबेथ बोर्न यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. बोर्न यांनी २०१७ मध्ये मॅक्रॉन यांच्या नेतृत्वाखाली परिवहन मंत्री म्हणूनही काम केले आहे. परिवहन मंत्री म्हणूनच्या कारकिर्दीत, SNCF रेल्वे कामगारांसाठी उदार पेन्शन आणि लाभ प्रणाली संपवण्यासाठी आठवडे संप आणि निदर्शने त्यांनी केली आहे. असे एका अहवालात म्हटले आहे. तसेच बोर्न यांनी महापौर बर्ट्रांड डेलानो यांच्या नेतृत्वाखाली पॅरिस सिटी हॉलमध्ये शहरी नियोजनावर काम केले आहे. माजी राष्ट्राध्यक्ष फ्रँकोइस मिटरॅंडच्या मंत्र्यांच्या सल्लागार म्हणून काम केले आहे.