कुलभूषण यांच्याबाबत पाकच्या उलट्या… | पुढारी | पुढारी

कुलभूषण यांच्याबाबत पाकच्या उलट्या... | पुढारी

इस्लामाबाद : वृत्तसंस्था

कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नीला दिलेल्या अपमानास्पद वागणुकीनंतरही पाकिस्तान स्वतःला मानवतेच्या चौकटीत उभा करण्याचा प्रयत्न करत आहे. जाधव कुटुंबीयांना देण्यात आलेल्या वाईट वागणुकीवर टीका होत असताना पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसीफ यांनी वेगळाच कांगावा केला आहे. आपण जाधव कुटुंबीयांची काळजी घेतल्याचे मत त्यांनी व्यक्‍त केले आहे.

सुषमा स्वराज यांनी संसदेत निवेदन देऊन पाकचा बुरखा फाडला. यावर माध्यमांशी बोलताना ख्वाजा म्हणाले, माणुसकीच्या नात्याने आम्ही जाधव यांच्या कटुुंबीयांना त्यांना भेटण्याची परवानगी दिली. ही भेट यशस्वी झाली, यासाठी पाकिस्तानचे कौतुक करायला हवे. या भेटीसाठी आधी 30 मिनिटांची वेळ ठरली होती. मात्र, नंतर ती 10 मिनिटांनी वाढवण्यात आली. जाधव यांच्या आईने पाकिस्तानचे आभारही मानले, अशा शब्दांत त्यांनी स्वतःचीच पाठ थोपटली. यावेळी त्यांनी पुन्हा कुलभूषण यांच्यावरील आरोपांना खतपाणी घालण्याचे काम केले. ते म्हणाले, कुलभूषण हे भारताचे नेव्ही कमांडर आहेत. पाकमध्ये हेरगिरी करणे आणि खुनाच्या आरोपाखाली त्यांना मृत्युदंड देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची कुटुंबीयांसोबत होणार्‍या भेटीत आम्ही सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड करणार नव्हतो.
कुलभूषण यांचे इराणमधून अपहरण

बलुचिस्तानमध्ये पाकविरोधात सुरू असलेल्या चळवळीचे नेते हिर्बयार मर्री यांनी, कुलभूषण यांना बलुचिस्तानमधून ताब्यात घेतले नाही, तर पाकिस्तानमधील कट्टरपंथीयांनी त्यांचे इराणमधून अपहरण केले. यानंतर त्यांना पाकिस्तानच्या स्वाधीन करण्यात आले आहे, असा दावा माध्यमांशी बोलताना केला आहे. भारतानेही कुलभूषण यांचे इराणमधून अपहरण करण्यात आले असावे, असा यापूर्वी अंदाज व्यक्‍त केला होता. 

Back to top button