राहण्यासाठी ‘स्वस्त’ देशात भारत दुसरा! | पुढारी

राहण्यासाठी ‘स्वस्त’ देशात भारत दुसरा!

ह्युस्टन : वृत्तसंस्था

राहण्यासाठी किंवा निवृत्तीनंतर शांत जीवन जगण्याचा विचार करीत असाल, तर भारतासारखा जगात ‘दुसरा’ देश नाही. ‘स्वस्ताई’ असलेल्या जगातील 112 देशांच्या यादीत भारताने द. आफ्रिकेनंतर दुसरा क्रमांक पटकावला आहे. ‘गो बँकिंग रेट्स’ने यासंदर्भात पाहणी केली असून खरेदीची क्षमता, भाडे, किराणा मालाचे भाव आणि ग्राहक किंमत निर्देशांक या चार निकषांवर ही पाहणी करण्यात आली आहे. यात भाड्यांच्या निर्देशांकात भारत सर्वात आघाडीवर असल्याचे म्हटले आहे.

दैनंदिन वापराच्या वस्तू आणि किराणा मालही इतर देशांच्या तुलनेत भारतात स्वस्त असल्याचे पाहणीत म्हटले आहे. कोलकात्यात राहणार्‍या एका व्यक्‍तीचा महिन्याचा खर्च सर्वसाधारणपणे 18 हजार रुपये इतका असतो. जगातील सर्वात स्वस्त 50 देशांमध्ये भारताची लोकसंख्या सर्वाधिक असली तरी प्रमुख शहरांत राहणार्‍या लोकांची खरेदी क्षमताही इतर देशांच्या तुलनेत चांगली आहे.

या यादीत पाक 14 व्या, नेपाळ 28 तर बांगला देश 40 व्या स्थानावर आहेत. खरेदी क्षमता, घरभाडे, किराणा माल आदींची तुलना न्यूयॉर्क शहरातील किमतीशी करण्यात आली आहे. न्यूयॉर्कपेक्षा भारतातील भाडे 70 टक्क्यांनी कमी असून किराणा आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तू 40 टक्क्यांनी स्वस्त आहेत. राहण्यासाठी द. आफ्रिका हा सर्वात स्वस्त देश असल्याचे पाहणीत म्हटले आहे. न्यूयॉर्कपेक्षाही द. आफ्रिकेतील लोकांची खरेदी क्षमता चांगली असल्याने या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. 

सर्वाधिक महागड्या देशांमध्ये बर्म्युडा, बाहमास, हाँगकाँग, स्वित्झर्लंड आणि घाना यांचा समावेश आहे.

Back to top button