अमेरिकेकडून ६० रशियन अधिकार्‍यांची हकालपट्टी | पुढारी

अमेरिकेकडून ६० रशियन अधिकार्‍यांची हकालपट्टी

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

हेर असल्याचा ठपका ठेवत अमेरिकेने रशियाच्या 60 राजनैतिक अधिकार्‍यांना देश सोडून जाण्याचे फर्मान बजावले आहे. तसेच सिएटल येथील रशियन दूतावास बंद करण्याचे आदेशही डोनाल्ड ट्रम्प सरकारने दिले आहेत. अमेरिकेपाठोपाठ युरोपियन देशांनीही रशियाच्या राजनैतिक अधिकार्‍यांची गच्छंती करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी रशियन गुप्‍तहेर सर्गेई स्क्रिपल आणि त्यांची मुलगी युलिया यांच्यावर ब्रिटनमध्ये रासायनिक हल्‍ला केल्यामागे रशियाचा हात होता, असा आरोप अमेरिकेसह युरोपातील देशांनी यापूर्वी केला आहे. या निर्णयाने अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएट युनियनदरम्यान 1950 ते 1990 दरम्यान झालेल्या शीतयुद्धाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्या काळातही राजनैतिक अधिकार्‍यांची हकालपट्टी करण्याची स्पर्धा दोन्ही देशांत होती.

हे 60 रशियन अधिकारी अमेरिकेत काम करताना हेरगिरी करत होते. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाने ही कारवाई केली असून हेरगिरी कोणत्याही प्रकारे खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा अमेरिकेने रशियाला दिला आहे. गच्छंती केलेल्या अधिकार्‍यांना अमेरिका सोडण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली दिली आहे. या अधिकार्‍यांची नावे सुरक्षेच्या कारणास्तव जाहीर करण्यात येणार नसल्याचे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे. जर्मनी, पोलंड, फ्रान्स, युक्रेन आणि लॅटव्हिया या पाच युरोपियन देशांनीही रशियन अधिकार्‍यांची गच्छंती करण्याचा निर्णय घेतला आहे. हेरगिरीच्या आरोपावरून युरोपियन संघातील 14 देश रशियन राजनैतिक अधिकार्‍यांना निलंबित करणार आहेत, असे युरोपियन युनियनचे अध्यक्ष डोनाल्ड टस्क यांनी सांगितले. 

Tags : 60 Russian, officer, extrusion,  from US

Back to top button