पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत-नेपाळ संबंध हिमालयाप्रमाणे अतूट | पुढारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, भारत-नेपाळ संबंध हिमालयाप्रमाणे अतूट

लुंबिनी ; वृत्तसंस्था : भारत आणि नेपाळचे संबंध हिमालयाप्रमाणे अतूट असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. लुंबिनीमध्ये बौद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी संबोधित करत होते. दोन्ही देशांतील नागरिक संबंध द़ृढ करून ते एका नव्या उंचीवर नेऊन ठेवतील, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

यावेळी येथील भारताच्या इंटरनॅशनल सेंटर फॉर बुद्धिस्ट कल्चर आणि हेरिटेजची कोनशिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते बसवण्यात आली. या केंद्रात बौद्ध परंपरेचा अभ्यास केला जाणार आहे.

ते म्हणाले, दोन्ही देशांनी परस्परातील संबंध हजारो वर्षांपासून टिकवले आहेत.नेपाळच्या विकासासाठी भारत खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचा मला आनंद आहे. मायादेवी मंदिराचे दर्शन घेतल्याचे मला भाग्य मिळाले. भगवान बुद्धांनी ज्या ठिकाणी जन्म घेतला तेथील चेतना अद्वितीय आहे.

नेपाळने आपल्या आध्यात्मिक आशीर्वादाने मला कृतार्थ केले आहे. प्रभू रामचंद्राविना नेपाळ अपूर्ण आहे. अयोध्येत राममंदिर होत असल्याने नेपाळी लोकही आनंदात आहेत. नेपाळ संस्कृती जपणारा देश आहे. भारत आणि नेपाळ अनेक वर्षांपासून बौद्ध शिक्षण केंद्र आहे. भारताचा सांस्कृतिक वारसा नेपाळबरोबर जोपासला जात आहे. भारत आणि नेपाळमधील मैत्री मानवतेसाठी प्रयत्नशील आहे. गौतम बुद्धांनी मानवतेच्या ज्ञानाची अनुभूती करून दिली. त्याग हेच खरे जीवन असल्याचे गौतम बुद्धांनी सांगितले असल्याचे यावेळी पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.

तत्पूर्वी पंतप्रधान मोदी नेपाळमध्ये पोहोचल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांनी त्यांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी मायादेवी मंदिरात पूजा केली. त्यानंतर त्यांनी पुष्कर्णी तलावाची परिक्रमा केली. त्याचबरोबर त्यांनी बोधी वृक्षाची पूजा करून जल अर्पण केले. त्यांनी अशोक स्तंभाजवळही दिवे लावले.

दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान देऊबा यांनी चर्चेसाठी लुंबिनी निवडले. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. लुंबिनीतून गौतम बुद्धांनी जगाला शांततेचा मार्ग दाखविल्याबद्दल हे ठिकाण चर्चेसाठी निवडले असल्याचे सांगण्यात आले.

पंतप्रधान मोदींकडून सहा करारांवर स्वाक्षरी

पंतप्रधान मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान शेरबहाद्दूर देऊबा यांच्यात विकास आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर चर्चा झाली. सांस्कृतिक आणि शिक्षण क्षेत्रासंबंधातील सहा करारांवर पंतप्रधान मोदी यांनी स्वाक्षरी केली.

Back to top button