अमेरिकेत वृत्तपत्र कार्यालयात गोळीबार;पाच ठार | पुढारी

अमेरिकेत वृत्तपत्र कार्यालयात गोळीबार;पाच ठार

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था

बातमी छापल्याच्या रागातून अमेरिकेच्या अ‍ॅनापोलिस शहरातील कॅपिटल गॅझेट या वृत्तपत्राच्या कार्यालयात घुसून जारॉड वॉरेन रामोस नावाच्या व्यक्‍तीने बेछूट गोळीबार केला. यात पाच जण ठार झाले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. 38 वर्षीय रामोसने 2012 साली या वृत्तपत्राविरोधात मानहानीचा खटलादेखील दाखल केला होता; पण या खटल्यात रामोसचा पराभव झाला.

द कॅपिटलचे माजी स्तंभलेखक थॉमस हार्टले यांनी रामोसविरोधात एक बातमी लिहिली होती. रामोसने फेसबुकवरून एका महिलेशी संपर्क साधला. त्यानंतर त्याने त्या महिलेला पाठवलेल्या वेगवेगळ्या ई-मेल्समध्ये  अश्‍लील नावे दिली, तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली, असे त्या वृत्तात म्हटले होते. 2013 साली अमेरिकन न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर 2015 साली वरिष्ठ न्यायालयानेही तोच निकाल कायम ठेवला. त्यामुळे रामोसचा कॅपिटल गॅझेटवर राग होता. याच रागातून गुरुवारी दुपारी रामोस वृत्तपत्राच्या कार्यालयात घुसला आणि गोळीबार केला.

Back to top button