Russia Ukraine War : रशियन लष्कराला पळवून लावले | पुढारी

Russia Ukraine War : रशियन लष्कराला पळवून लावले

कीव्ह/ मॉस्को ; वृत्तसंस्था : युक्रेन शहरावरील रशियाचे हल्ले (Russia Ukraine War) अद्याप सुरूच आहेत. याच दरम्यान युक्रेन लष्कराने खार्किव्ह शहरातून रशियाच्या सैनिकांना पिटाळून लावले असल्याचा दावा मेयर इहोर तेरखोव्ह यांनी केला आहे. खार्किव्हचे प्रादेशिक सेना आणि युक्रेनच्या आर्म्ड फोर्समुळे रशियन सैनिकांना माघारी परतावे लागले आहे.

दरम्यान, अमेरिकन खासदारांनी कीव्हमध्ये राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेऊन चर्चा केली. रशिया दहशतवादाला पाठबळ देत असल्याची घोषणा अमेरिकेने करावी, अशी मागणी झेलेन्स्की यांनी यावेळी केली. तसेच झेलेन्स्की यांनी द्वीपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी अमेरिकेकडे मागणी केली.

दरम्यान, युद्धामुळे युक्रेनचे 23 टक्के रेल्वे जाळे उद्ध्वस्त झाले आहे. पूर्व युक्रेनमधील डोनेटस्कमध्ये रशियाचे हल्ले अद्याप सुरूच आहेत. दरम्यान रशियाशी आम्हाला शांततामय संबंध राखावयाचा असून आम्हाला सीमेवर कोणत्याही प्रकारचा तणाव मान्य नसल्याचे वक्‍तव्य फिनलंडचे परराष्ट्रमंत्री पेक्‍का हॉविस्टो यांनी केले आहे. रशियाशी आमची 1300 किलोमीटर लांब सीमा आहे. दोन्ही देशात संवाद माध्यम राहण्याची गरज असल्याचे हॉविस्टो म्हणाले.

नाटोमध्ये फिनलंड, स्वीडनला सहभागी करा : जर्मनी (Russia Ukraine War)

नाटोमध्ये फिनलंड आणि स्वीडनला सहभागी करून घेण्यास आपला पाठिंबा असल्याचे जर्मनीचे पररराष्ट्रमंत्री अ‍ॅनालेना बारबॉक यांनी सांगितले. स्वीडन आणि फिनलंडला शांतता हवी आहे, पण रशियाच्या हल्ल्यामुळे या दोन्ही देशांनाही फटका बसला असल्याचे बारबॉक यांनी सांगितले.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी एका कायद्यावर शनिवारी स्वाक्षरी केली. जे पक्ष युक्रेनच्या विरोधातील रशियाच्या युध्दाचे समर्थन करतील त्यांच्यावर बंदी घालण्यात येईल. रशियाने क्रिमिया आणि पूर्व डोनबासवर रशियाने कब्जा केला आहे हे ज्यांना मान्य नाही त्यांच्यावर या नवीन कायद्यानुसार बंदी घालण्यात येईल.

Back to top button