इम्रान खानचा ‘विजय’ ठरणार सरकार स्थापनेतील अडथळा! | पुढारी

इम्रान खानचा 'विजय' ठरणार सरकार स्थापनेतील अडथळा!

इस्लामाबाद: पुढारी ऑनलाईन

पाकिस्तानमधील निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. निवडणुकीत इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने ११६ जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला खरा पण सत्ता स्थापनेसाठीचे संख्याबळ त्यांना मिळवता आले नाही. या निवडणुकीतील आणखी एक विक्रम म्हणजे इम्रान खान यांनी ५ मतदारसंघातून विजय मिळवला आहे. याआधी नवाझ शरीफ ४ मतदारसंघातून विजय मिळवला होता. पण इम्रान यांचा हा विजय पक्षासाठी अडचणीचा ठरणार आहे.   

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या नियमानुसार उमेदवाराने जर एकापेक्षा अधिक मतदारसंघातून विजय मिळवला तर त्याला केवळ एकच ठिकाणचे प्रतिनिधित्व करता येतो. इम्रान यांनी पक्षाला अधिक जागा मिळाव्यात म्हणून पाच ठिकाणी निवडणूक लढवली आणि विजय सुद्धा मिळवला खरा. पण आता त्यांना चार ठिकाणाहून राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे संसदेतील पक्षाचे संख्याबळ ११२वर येईल.  

इम्रान यांना सरकार स्थापन करण्यासाठी किमान १३७ जागांची गरज आहे. त्यासाठी पीटीआयला अन्य पक्षांसोबत आघाडी करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. इम्रान खान पाकिस्तान पिपल्स पार्टी (पीपीपी) या नवाझ शरीफ यांच्या पक्षासोबत कोणत्याही परिस्थितीत आघाडी करणार नाही. त्यामुळे अन्य छोट्या पक्षांची मदत घेण्याशिवाय इम्रान यांच्यासमोर दुसरा पर्याय नाही. 

सध्याच्या परिस्थितीनुसार पीटीआयला पीएमएल-क्यू, बलुचिस्तान आवामी पार्टी यांच्यासोबत आघाडी करता येईल. पण तरीही संसदेतील संख्याबळ १२४वर पोहोचेल. जे सध्या बहुमतासाठी कमीच ठरले. त्यामुळे इम्रान खान यांना एमक्यू-एम, जीडीए आणि अन्य अपक्षांची मदत घ्यावी लागेल. या सर्वांना एकत्र घेतल्यास १३७ची मॅजिक फिगर गाठता येईल. पण अशा परिस्थितीत देखील इम्रान यांनी ४ जागांवर राजीनामा दिल्यामुळे अडचणी वाढू शकतील.

Back to top button