फेसबुककडून म्यानमारमधील लष्कराची अकाऊंटस डिलीट | पुढारी

फेसबुककडून म्यानमारमधील लष्कराची अकाऊंटस डिलीट

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

जातीय आणि धार्मिक तणावाच्या पार्श्वभूमीवर फेसबुकने म्यानमार देशातील उच्च पदस्थांची अनेक अकाऊंट डिलीट केली आहेत. यात म्यानमारच्या लष्कर प्रमुखांच्या अकाऊंटचा समावेश आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाने म्यानमारमध्ये मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. याबाबत संयुक्त राष्ट्रसंघाने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात जातीय आणि धार्मिक तणाव निर्माण करण्यासाठी फेसबुक सारख्या सोशल मीडियाचा वापर केला जात असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर या अहवालाची दखल घेत फेसबुकने म्यानमारमधील उच्च पदस्थांची अकाऊंटस डिलीट केली आहेत.

”फेसबुकवरील 18 अकाऊंटस, एक इन्स्टाग्राम अकाऊंट आणि 1.20 कोटी लोक फॉलो करणारे 52 फेसबुक पेजीस डिलीट केली आहेत,” असे फेसबुकने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. म्यानमार लष्कर प्रमूख मिन आंग हलांग आणि म्यानमार टेलिव्हिजन नेटवर्कशी संबंधित फेसबुकवरील अकाऊंट डिलीट करण्यात आली आहेत. देशात जातीय आणि धार्मिक तणाव रोखण्याच्या उद्देशाने ही अकाऊंट डिलीट केली असल्याचे फेसबुकने स्पष्ट केले आहे.

म्यानमारमधील सैन्यातील अधिकाऱ्यांकडून आक्षेपार्ह लेख आणि फेक न्यूज फेसबुकवर पोस्ट केली जात होते. अशी अकाऊंटस फेसबुकने डिलीट केली आहेत. जे लोक फेसबुक माध्यमाचा वापर करून जातीय आणि धार्मिक तणाव निर्माण करत आहेत; अशा लोकांच्या फेसबुक वापरावर आम्ही प्रतिबंध घालत आहोत, असे फेसबुकने नमूद केले आहे. 

रोहिंग्यांच्या नरसंहार प्रकरणी लष्कर प्रमुखांवर खटला चालवा 

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये दहशतवादी संघटना रोहिंग्या साल्वेशन आर्मीने म्यानमारमधील पोलिस आणि लष्कराच्या 30 चौक्यांवर हल्ला केला होता. त्यानंतर रोहिंग्या मुस्लिमांच्या विरोधात हिंसाचार भडकला होता. त्यामुळे सुमारे सात लाख रोहिंग्यांनी बांगलादेशात स्थलांतर केले. रोहिंग्या मुस्लिमांच्या नरसंहार प्रकरणी म्यानमारच्या लष्कर प्रमुखांवर खटला चालवायला हवा, असे संयुक्त राष्टसंघाने आपल्या अहवालात म्हटले आहे. 

 

Back to top button