दहशतवाद पोसणार्‍यांशी चर्चा कसली? (Video) | पुढारी

दहशतवाद पोसणार्‍यांशी चर्चा कसली? (Video)

संयुक्‍त राष्ट्रसंघ : वृत्तसंस्था

दहशतवाद पोसण्यात आणि तो पसरविण्यात हातखंडा असणार्‍या पाकिस्तानशी चर्चा होऊच शकत नाही. दहशतवाद्यांना आश्रय देऊन  वर निलाजरेपणाने तो मी नव्हेच, असे सांगणारा पाकिस्तान आमच्याकडून चर्चेची अपेक्षा ठेवतोच कशी? अशा शब्दांत परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी शनिवारी संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या आमसभेत पाकिस्तानच्या संभावितपणाचा बुरखा फाडला.

दहशतवादाचा राक्षस फारच वेगाने फोफावतो आहे. त्याला काबूत आणणे हे आपणा सर्वांसमोरील मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानसारखे आमच्या शेजारचे राष्ट्र दहशतवादाला खतपाणी घालत आहे. भारतात अस्थिरता माजविण्यासाठी त्यांचा वापर करीत आहेत, असा थेेट आरोप सुषमा स्वराज यांनी केला. त्या म्हणाल्या, न्यूयॉर्कमध्ये झालेला 9/11 चा हल्ला आणि मुंबईतील 26/11 चा हल्ला या दोन घटना विचारात घेतल्या, तर शांतता प्रक्रियेवर त्या आघात करणार्‍या होत्या.  9/11च्या हल्ल्यातील मास्टरमाईंड लादेन याला अमेरिकेने पाकिस्तानात घुसून मारले. मात्र, मुंबईवरील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद अजून जिवंत आहे. तो पाकिस्तानात उजळ माथ्याने फिरत आहे. इतकेच नव्हे, तर पाकिस्तान त्याला सन्मानाची वागणूक देत आहे. त्यांनी दिलेल्या सन्मानामुळेच तो पाकिस्तानात सभा घेत आहे, इशारे देत आहे आणि  पाकिस्तान काहीही करू शकत नाही. अशा परिस्थितीत भारत त्यांच्याशी चर्चा करेल असे त्यांना वाटलेच कसे, असा सवाल त्यांनी केला.

पाकिस्तानच्या नव्या सरकारवरही सुषमा स्वराज यांनी शाब्दिक फटके लगावले. पाकिस्तानात सत्ताबदल झाल्यानंतर आता त्यांना भारताशी चर्चा करणे गरजेचे वाटू लागले आहे. मात्र, एकीकडे चर्चेची दारे उघडायची आणि  दुसरीकडे दहशतवादही जोपासायचा, ही दुटप्पी भूमिका चालणार नाही.  दोन्ही देशात चर्चा व्हावी, तणाव निवळावा, असे भारताला नेहमीच वाटते; पण समोरून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसेल, त्यांची तिरकी चाल बदलत नसेल, तर मग भारत काय करू शकतो. अशा परिस्थितीत चर्चेचे दरवाजे बंद करण्याशिवाय कोणताच पर्याय उरत नाही. पाकिस्तानला संघर्षाची भूमिकाच प्रिय असेल, तर मग त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यास भारत समर्थ आहे, असे त्यांनी ठणकावले.

तीन भारतीय जवानांच्या अपहरणाचा आणि हत्येचाही उल्लेखही त्यांनी केला.

भारतात मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप पाकिस्तान वारंवार करतो. गेल्या वर्षी त्यांच्या प्रतिनिधींनी त्याबाबतचे काही फोटो जगासमोर आणले. मात्र, नंतर ते फोटो भारतातील नसून दुसर्‍याच कोणत्या तरी देशातील असल्याचे पुढे आले. असा खोटारडेपणा करणार्‍या पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचीच प्रतिमा मलिन करून घेतल्याचे  सुषमा स्वराज म्हणाल्या.

सुषमा स्वराज यांचे शाब्दिक फटके…

 पाकला संघर्षच प्रिय असेल, तर जशास तसे उत्तरही देऊ

 दहशतवाद्यांना आश्रय देत वर तो मी नव्हेच म्हणणारा पाकिस्तान खोटारडा

 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड पाकिस्तानात उजळ माथ्याने फिरतोय

 भारताविरुद्ध खोटे पुरावे देऊन पाकिस्तानने हसे करून घेतले

 तिरकी चाल बदला तरच चर्चेबाबत विचार करता येईल

 भारत चर्चेबाबत सकारात्मक, पाकची भूमिका दुटप्पी

 

Back to top button