भ्रष्टाचार प्रकरणी बांगलादेशच्या माजी PM खालिदा झियांना सात वर्षाची शिक्षा  | पुढारी

भ्रष्टाचार प्रकरणी बांगलादेशच्या माजी PM खालिदा झियांना सात वर्षाची शिक्षा 

ढाका (बांगलादेश) : पुढारी ऑनलाईन

भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांना आणखी एका प्रकरणात ढाका येथील न्यायालयाने सात वर्षाची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण झिया चॅरिटेबल ट्रस्टच्या भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. विशेष म्हणजे बांगलादेशमधील सार्वत्रिक निवडणुका तोंडावर असताना खालिदा झिया यांनी शिक्षा सुनावली आहे.

खालिदा झिया (वय ७३) गेल्या फेब्रुवारीपासून अनाथालयातील निधी अपहार प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. त्यांना याप्रकरणी यापूर्वीच पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात खालिदा झिया आणि त्यांचा मोठा मुलगा तारिक रहमान याच्यासह पाच लोकांवर २००१ से २००६ दरम्यान बांगलादेश पंतप्रधान पदावर असताना २ लाख ५३ हजार डॉलर रकमेचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

झिया आणि अन्य तिघांनी सत्तेचा दुरुपयोग करत झिया चॅरिटेबल ट्रस्टसाठी ३,७५,००० डॉलर निधी मिळवला होता. हा निधी कोणी दिला हे स्पष्ट झाले नव्हते. या प्रकरणी न्यायाधीश मोहम्मद अख्तारुझ्झमान यांनी हा निवाडा दिला आहे. ढाका येथील नझिमुद्दीन रस्त्यावरील तुरुंगातच तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या न्यायालय कक्षात हा निवाडा सुनावण्यात आला. ज्यावेळी शिक्षा सुनावण्यात आली त्यावेळी झिया उपस्थित नव्हत्या. त्यांच्यावर ६ ऑक्टोबरपासून बंगबंधू शेख मुजीब मेडिकल विद्यापीठाच्या इस्पितळात उपचार सुरू आहेत. त्यामुळे त्या न्यायालयात येऊ शकलेल्या नसल्याचे सांगण्यात आले आहे.

झिया चॅरिटेबल ट्रस्टमधील भ्रष्टाचार प्रकरणी २०११ मध्ये भ्रष्ट्राचार विरोधी आयुक्तालयाने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी)च्या अध्यक्ष असलेल्या खालिदा झिया यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला होता. झिया यांच्यासह अन्य तिघांवर झिया चॅरिटेबल ट्रस्टसाठी मोठा निधी मिळवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी झिया यांचे माजी राजकीय व्यवहार सचिव हॅरिस चौधरी, झियाउल इस्लाम मुन्ना, ढाकाचे माजी महापौर सादीक हुसैन तसेच मोनिरूल खान यांना दोषी ठरविले आहे.

झिया यांना शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्या पक्षाने हा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे. 

 

Back to top button