विमान कोसळून १८९ जणांना जलसमाधी | पुढारी

विमान कोसळून १८९ जणांना जलसमाधी

जकार्ता : वृत्तसंस्था 

इंडोनेशियातील जावा समुद्रात लायन एअरवेजचे विमान कोसळून भारतीय वैमानिकासह 189 जणांना जलसमाधी मिळाली. जकार्ताहून उड्डाण केल्यानंतर सकाळी 6 वाजून 33 मिनिटांनी ही दुर्घटना घडली. इंडोनेशियातील हा सर्वात मोठा विमान अपघात आहे.  

सोमवारी जकार्ताहून उड्डाण केल्यानंतर 13 मिनिटांतच विमान समुद्रात कोसळले. वैमानिक भाव्ये सुनेजा, सहवैमानिक, चार कर्मचारी आदींसह 189 जण विमानात होते. दुर्घटनेनंतर सर्वांना जलसमाधी मिळाली. 

बचाव पथकाची शोधमोहीम

जावा समुद्रात बचाव पथकाने शोधमोहीम हाती घेतली आहे. विमान दुर्घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. विमान दुर्घटनेच्या घटनेचा नेमका उलगडा होण्यासाठी ब्लॅक बॉक्सची शोधमोहीम जवानांनी हाती घेतली आहे. विमान जेटी-610 जकार्ताहून पान्गकल पिनांगला जात असताना ही दुर्घटना घडली. विमानाने जकार्ता विमानतळावरून उड्डाण केले होते. उड्डाणाच्या 13 मिनिटांनंतर विमानाचा संपर्क तुटला. संपर्क तुटण्यापूर्वी पायलटने विमान परतीचे संकेत दिले होते, असे सांगितले जात आहे. प्रवाशांमध्ये 178 प्रौढ, एक बालक, दोन नवजात, दोन पायलट आणि पाच फ्लाईट अटेंडंट व वैमानिक यांचा समावेश होता. प्रवाशांबाबत अद्याप काही माहिती समजू शकलेली नाही. शोधमोहीम सुरू आहे. राष्ट्रीय शोध आणि बचाव संस्थेचे प्रवक्‍ते युसूफ लतीफ यांनी विमान कोसळल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे.  दरम्यान, याआधीही या लायन एअरवेजच्या विमानाला सोलो शहरात 2004 साली अपघात झाला होता. त्यावेळी विमानातील 163 प्रवाशांपैकी 25 जणांचा मृत्यू झाला होता. 

सर्वात मोठा विमान अपघात

दरम्यान, सोमवारचा विमान अपघात इंडोनेशियाच्या इतिहासातील सर्वात मोठा विमान अपघात आहे. याआधी 2004 साली झालेल्या इंडोनेशियातील विमान दुर्घटनेत 165 लोकांचा मृत्यू झाला होता. युरोपियन देशांनी तब्बल नऊ वर्षे लायन एअरवेजच्या विमानांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकले होते.

सुनेजांना माघारी परतण्याची मिळाली होती सूचना 

उड्डाणानंतर विमानात तांत्रिक दोष निर्माण झाल्याचे भारतीय वैमानिक भाव्ये सुनेजा यांच्या निदर्शनास आले होते. त्यांनी तत्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधलाही होता. विमानाचे परत लँडिंग करण्याची परवानगीही त्यांना मिळाली होती. मात्र,नियतीच्या मनात दुसरेच होते.

विमानाचे तुकडे, सर्वांना जलसमाधी

बचाव पथकांना या विमानाचे अवशेष तुकड्यांमध्ये सापडले आहेत. यापैकी एक विमानाच्या मागच्या भागाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समुद्रात विमानाचे अवशेष आणि प्रवाशांच्या वस्तूंचा थर साचला होता.

दुर्घटनेपूर्वी विमानाचा वेग वाढला 

उड्डाणानंतर विमान पाच हजार फूट उंचीवर गेले होते. नियंत्रण कक्षाशी संपर्क होण्याआधी विमान 3650 फूट उंचीवर होते. दुर्घटनेपूर्वी विमानाचा वेग वाढला होता. 

याआधीही लायन एअरवेजला अपघात 

लायन एअर हे खासगी कंपनीचे विमान आहे. या कंपनीच्या विमानाला 2003 आणि 2004 सालीही अपघात झाला होता. युरोपमध्ये या विमानाच्या उड्डाणावर तब्बल नऊ वर्षे बंदी होती. लायन एअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी एडवर्ड सैट यांनी या विमानात रविवारीच तांत्रिक दोष निर्माण झाल्याची कबुली दिली आहे. तथापि, सोमवारी अभियंत्याने विमानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त केला होता. त्यानंतरच विमानाच्या उड्डाणास परवानगी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

Back to top button