‘सौदी अरेबियाच खशोग्‍गींच्या हत्येला जबाबदार’ | पुढारी

'सौदी अरेबियाच खशोग्‍गींच्या हत्येला जबाबदार'

लंडन : पुढारी ऑनलाईन

प्रतिभावन पत्रकार जमाल खशोग्‍गी यांच्या हत्येप्रकरणी जगभरातून सौदी अरेबियावर दबाव वाढत आहे. आता खशोग्गी यांची तुर्कस्तानमधील प्रेयसी (फियान्सी) हॅटिस सेंगीझ यांनी खशोग्गी यांच्या हत्येप्रकरणी सौदी अरेबियाला जबाबदार धरले आहे. खशोग्गी यांच्या हत्येप्रकरणी सौदीने माहिती द्यावी; जेणेकरून हत्येमागे नेमके कोण आहे हे स्पष्ट होईल, असेही सेंगीज यांनी म्हटले आहे. 

सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स महमंद बिन सलमान ‘रिफॉर्मर’ म्हणून पाश्चिमात्य देशांमध्ये निर्माण करत असलेल्या प्रतिमेवर पत्रकार खशोग्गी कडाडून टीका करत होते. त्यामुळे २ ऑक्टोबर रोजी तुर्कस्तानमधील इस्तंबूल येथील सौदी अरेबियाच्या दुतावासात गेल्यानंतर खशोग्गी यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यांची क्रुरपणे हत्या करण्यात आली होती.

खशोग्गी यांना कसे मारण्यात आले; हे सौदी अरेबियाला माहिती आहे. त्यांनी आता यावर आता खुलासा द्यावा, असे आव्हान सेंगीज यांनी दिले आहे. पत्रकार खशोग्गी हे तुर्कस्तानच्या नागरिक असलेल्या सेंगीझ यांच्याशी लग्न करणार होते. त्यासाठी ते काही दस्तावेज मिळवण्यासाठी इस्तंबूल येथील दुतावासात २ ऑक्टोबर रोजी गेले होते. त्यानंतर ते दुतावासातून परत आलेच नाहीत.

खशोग्गी यांची हत्या कोणी केली, कोणी घडवून आणली हे उजेडात आणून संबंधितांना आंतरराष्ट्रीय कायद्याखाली शिक्षा देण्याची जबाबदारी माझ्या देशाची आहे, असेही सेंगीझ यांनी म्हटले आहे.

आपण सौदी अरेबियाचे प्रिन्स मोहम्मद अथवा राजघराण्याशी संपर्क साधलेला नाही. तसेच त्यांनीही खशोग्गी यांच्या मृत्यूबद्दल श्रद्धांजली वाहिलेली नाही, असा खुलासा त्यांनी केला आहे. 

दरम्यान, खशोग्गी यांच्या हत्येत आपला हात नसल्याचे म्हणत सौदी अरेबियाने हात वर केले आहेत.  

 

Back to top button