रशिया-युक्रेन युद्धामुळे स्थलांतरित पक्षी माघारी - पुढारी

रशिया-युक्रेन युद्धामुळे स्थलांतरित पक्षी माघारी

डेहराडून/भोपाळ/बंगळूर ; वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या युद्धाचा विपरीत परिणाम आता पर्यावरण तसेच ‘इको-सिस्टीम’वरही दिसू लागलेला आहे. मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटकमध्ये पक्ष्यांवर सुरू असलेल्या अध्ययनातून ही माहिती समोर आली आहे.

मध्य प्रदेशातील उन्हाळ्यातील पक्षी निरीक्षण आणि गणना उपक्रमानुसार 266 प्रजातींचे स्थलांतरित पक्षी येथे दाखल झाले होते; पण यापैकी 150 शीतकालीन प्रवासी पक्षी उन्हाळा संपत आला; तरी अद्याप येथेच मुक्कामी आहेत, असे आढळून आले आहे. यातील बहुतांश पक्षी हे रशियातील सैबेरियातील आहेत. हे पक्षी सैबेरियाच्या दिशेने निघाले होते; पण पुन्हा परतून आले, असा निष्कर्ष पक्षीतज्ज्ञांनी काढला आहे.

हीच परिस्थिती उत्तराखंड आणि कर्नाटकमध्येही आढळून आली. दोन्ही राज्यांत एकूण 384 प्रजातींचे शीतकालीन पक्षी स्थलांतराची वेळ बरीच उलटून गेल्यावरही येथेच तळ ठोकून असल्याचे समोर आले आहे. 384 पैकी 195 पक्षी अद्याप स्वगृही (सैबेरिया) परतलेले नाहीत. दुसरीकडे, चीन आणि मंगोलियातून येथे आलेले पक्षी मात्र आपापल्या देशांत परतले आहेत.

यापूर्वीही आखाती युद्धाच्या वेळी पक्ष्यांचे स्थलांतर असेच ‘डिस्टर्ब’ झाले होते, असे भोपाळ पक्षी संस्थेचे मोहम्मद खालिक यांनी सांगितले. कर्नाटकच्या अपूर्वा लक्ष्मी यांनी या निष्कर्षावर अधिक अध्ययनाची गरज असल्याचे मत व्यक्त केले. उत्तराखंडचे पक्षीतज्ज्ञ डॉ. फय्याझ खुदसर म्हणाले की, ही वेळ या न परतलेल्या प्रवासी पक्ष्यांची तेथील (सैबेरियातील) विणीची वेळ (अंडी घालण्याची) आहे. ते जर ठरल्या ठिकाणी वेळेत पोहोचले नाहीत, तर आपला वंश पुढे नेऊ शकणार नाहीत. इथेच थांबले तर ते मरूही शकतील.

रशिया-युक्रेन मार्गे आलेले पक्षी

युरेशियन पीजन, युरेशियन कूट, नॉर्थर्न शोव्हलर, नॉर्थर्न पिनटेल, बार हेडेड गीज, ग्रे लेग गीज, रोझी स्टर्लिंग, युरेशियन स्पूनबिल, गढवाल, मल्लॉर्ड, रेड क्रेस्टेड पोचार्ड, कॉमन पोचार्ड, गार्गेनी, केंटिश प्लॉवर, कॉमन स्निप आदी.

* चीन, मंगोलियाचे पक्षी परतले
* सैबेरियन मार्गात युद्धग्रस्त क्षेत्र; सैबेरियन पक्ष्यांचा भारतातच मुक्काम
* पक्ष्यांच्या अस्तित्वालाच धोका

Back to top button