…म्‍हणून केला एअर स्‍ट्राइक; सुषमा स्‍वराज यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडली भूमिका | पुढारी

...म्‍हणून केला एअर स्‍ट्राइक; सुषमा स्‍वराज यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडली भूमिका

वुझेन (चीन) : पुढारी ऑनलाईन

भारताने पाकिस्‍तानचा खरा चेहरा आज पुन्हा आंतरराष्‍ट्रीय व्यासपीठावर उघडा पाडला. चीनच्या वुझेनमध्ये १६ वी रशिया, भारत आणि चीन या देशांची (RIC) मंत्रीस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत भारताच्या परराष्‍ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्‍वराज यांनी भारताच्या जम्‍मू- काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याविषयी माहिती दिली. तसेच या हल्‍ल्‍यात पाकिस्‍तानस्‍थित जैश-ए- मोहम्‍मद या दहशतवादी संघटनेचा कसा हात आहे हे ही सांगितले. तसेच वारंवार सांगुनही पाकिस्‍तानने जैशच्या दहशतवाद्‍यांवर कारवाई न केल्‍यामुळे भारताने एअर स्‍ट्राइकव्‍दारे दहशतवाद्‍यांच्या तळावर हल्‍ला केल्‍याचे सांगितले. 

यावेळी सुषमा स्‍वराज यांनी बोलताना, पुलवामा हल्‍ल्‍यामध्ये भारताचे सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या हल्‍ल्‍यात पाकिस्‍तानस्‍थित जैश ए मोहम्‍मदचा हात आहे. हे आता जगाला माहित झाले आहे. त्‍यामुळे अशा दहशतवादी हल्‍ल्‍याविरोधात सगळ्‍या देशांनी आता झिरो टॉलेरन्सची निती अवलंबायला हवी, तसेच अशा दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्याची गरज असल्‍याची  भूमिका त्‍यांनी मांडली.

पुलवामा हल्‍ल्‍यानंतर पाकिस्‍तानस्‍थित जैशच्या संघटनेवर कारवाई करण्यासाठी देशभरातून सांगण्यात आले असतानाही, पाकिस्‍तानने त्‍याकडे डोळेझाक केली. तसेच जैशने या हल्‍ल्‍याची जबाबदारी घेतल्‍यावरही पाककडून या गोष्‍टीला पाकिस्‍तानकडून साफ नकार देण्यात आला. त्‍यामुळे भविष्‍यातही या संघटनेकडून भारतविरोधी कारवाई करण्याची शक्‍यता असल्‍याने भारताने एअर स्‍ट्राइकव्दारे दहशतवादी तळांवर हल्‍ला केल्‍याचे सुषमा स्‍वराज यांनी बैठकीत सांगितले. 

तसेच स्‍वराज यांनी, हे नॉन मिलिटरी ऑपरेशन होते. यामध्ये कोणत्‍याही सैन्य ठिकाणांना लक्ष्य करण्याचा आमचा उद्‍देश नव्हता, तर यामध्ये जैशच्या दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. यावेळी भारत आणि चीन यांच्या संबंधांवर बोलताना स्‍वराज यांनी भारत आणि चीन यांच्यामध्ये सौहार्दपूर्ण संबध आहेत. एप्रिल २०१८ मध्ये वुहानमध्ये पंतप्रधान मोदी आणि राष्‍ट्रपती शी झिनपिंग यांच्यातील बैठकीनंतर दोन देशांतील संबंधात प्रगती झाल्‍याचा त्‍यांनी उल्‍लेख केला. 

Back to top button