एअर स्ट्राईक : अमेरिकेने पाकला फटकारले; दहशतवादी संघटनांवर कारवाई करा | पुढारी

एअर स्ट्राईक : अमेरिकेने पाकला फटकारले; दहशतवादी संघटनांवर कारवाई करा

वॉशिंग्टन (अमेरिका) : पुढारी ऑनलाईन

पुलवामा हल्ल्याचा बदला म्हणून मंगळवारी (दि.२६) पहाटे भारताने हवाई दलाने मोठी कारवाई करत एलओसी ओलांडून हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश- ए- मोहम्मदचा दहशतवादी तळ उद्‌ध्वस्त केला. या कारवाईनंतर ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सनंतर आता अमेरिकेने भारताच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. पाकिस्तानने त्यांच्या जमिनीवरील दहशतवादी गटांवर कारवाई करावी, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियो यांनी सांगत पाकिस्तानला झटका दिला आहे.

”आपण पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांच्याची चर्चा केली आहे. लष्करी कारवाई टाळून सध्याची तणावस्थिती कमी करावी आणि पाकिस्तानने त्यांच्या जमिनीवरील दहशतवादी गटांविरुद्ध ठोस कारवाई करावी”, असे सांगितल्याचे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियो यांनी म्हटले आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारताने २६ फेब्रुवारी रोजी दहशतवादाविरोधात केलेल्या कारवाईनंतर आपण परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी चर्चा केली. शांतता कायम रहावी आणि भारत आणि अमेरिका दरम्यान द्विपक्षीय सुरक्षा भागीदारी या मुद्यांवर जोर दिला आहे. आपण दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांना, दोन्ही देशांदरम्यान शांतता हवी आहे, असे सांगितले आहे. तणावस्थिती कमी करण्याकडे लक्ष दिले पाहिजे.   

Back to top button