'जैश'चा म्होरक्या मसूद अजहरला ब्लॅक लिस्ट करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्सचा प्रस्ताव | पुढारी

'जैश'चा म्होरक्या मसूद अजहरला ब्लॅक लिस्ट करण्यासाठी अमेरिका, ब्रिटन, फ्रान्सचा प्रस्ताव

न्यूयॉर्क : पुढारी ऑनलाईन

पुलवामा हल्ल्याचा कट रचणाऱ्या जैश-ए- मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी आणि त्याचा काळ्या यादीत समावेश करण्यासाठी अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडला आहे. ‘जैश’ने भारताच्या सीआरपीएफ ताफ्यावर हल्ला केला होता, असे प्रस्तावात नमूद केले आहे.

मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचे आवाहन भारताने अनेकवेळा केले आहे. याबाबत अमेरिका आणि ब्रिटनने याआधी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत प्रस्ताव मांडला होता. मात्र, त्यात चीनने खोडा घातला होता. चीनने या प्रस्तावावर नकार दर्शविला होता. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यावर एकमत झाले नव्हते. जर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले तर त्याच्या दहशतवादी कारवाया रोखल्या जातील. तसेच त्याच्या प्रवासावर आणि मालमत्तेवर टाच येईल. 

 ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरानजीक असलेल्या गोरीपोरा या ठिकाणी १४ फेब्रुवारी रोजी घडवून आणलेल्या आत्मघाती स्फोटात, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) ४० जवान शहीद झाले. या पार्श्वभूमीवर ‘जैश-ए-मोहम्मद’या संघटनेचा म्होरक्या कुख्यात दहशतवादी मौलाना मसूद अजहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी आणि त्याच्यावर कारवाई करण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी भारताला अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनने पाठिंबा दिला आहे. 

अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने १५ सदस्यीय संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद समितीकडे दाखल केलेल्या प्रस्तावात म्हटले आहे की, मसूद अजहरवर शस्त्रास्त्र आणि जागतिक प्रवास बंदी घालावी तसेच त्याची संपत्ती जप्त करावी. विशेष म्हणजे तीन देशांनी हा प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव मंजूर होणार की नाही, हे आता चीनच्या भूमिकेवर ठरणार आहे.

वाचा : #PulwamaAttack;कोण आहे मसूद अजहर

दरम्यान, अबूधाबीमध्ये १ मार्च रोजी होणाऱ्या इस्लामिक देशांच्या बैठकीत भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडून हा मुद्दा उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. 

Back to top button