पाकचे लोटांगण : इम्रान खानची नरमाईची भाषा | पुढारी

पाकचे लोटांगण : इम्रान खानची नरमाईची भाषा

इस्लामाबाद : पीटीआय/वृत्तसंस्था

सीमेवर सतर्क असलेल्या भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा डाव उधळून लावल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नरमाईची भूमिका घेतली आहे. पुलवामा घटनेची चौकशी करण्यास आम्ही तयार आहोत. दोन्ही देश अण्वस्त्र सज्ज असले, तरी युद्धाने कोणाचे भले होणार नाही, अशी मखलाशी करीत खान यांनी, भारतासमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवत सपशेल लोटांगण घातले.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता बॉम्बहल्ले केले. पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी केलेल्या या कारवाईत सुमारे 350 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. या हल्ल्यानंतर सैरभैर झालेल्या पाकिस्तानी लष्कराकडून सीमेवर मंगळवारपासून कुरापती सुरू होत्या. भारतीय चौक्यांवर पाक सैनिकांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली होती. जवानही सीमेवर पाक सैनिकांना चोख प्रत्युत्तर देऊन त्यांचे मनसुबे उधळून लावत आहेत. पाकच्या हवाई दलाचे एफ-16 हे लढाऊ विमान जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय हद्दीत घुसले होते. हवाई दलाने त्वरित कारवाई करून पाकचे विमान 

पाडले.

नरमाईचा सूर

भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांनी नरमाईचा सूर आळवण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी दूरचित्रवाहिनीला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी शरणागती पत्करल्याचे स्पष्ट झाले. या भाषणात ते म्हणाले की, दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत. त्यामुळे उभय देशांतील तणाव कमी व्हावा, असा आमचा प्रस्ताव आहे. पुलवामा हल्ल्याबाबत आम्ही चौकशी करण्यास तयार आहोत. दहशतवादाच्या मुद्यावर चांगल्या वातावरणात भारतासोबत चर्चा करण्याची आमची तयारी आहे. तुम्ही आमच्या प्रदेशात आल्यास आम्हीही तुमच्या हद्दीत येऊ शकतो. मात्र, युद्धाचे परिणाम दीर्घकालीन असतात.  शस्त्रे तुमच्याकडेही आहेत आणि आमच्याकडेही आहेत. मात्र, युद्धाने कुणाचेही हित होणार नाही. 

एकत्र येऊन समस्यांवर तोडगा काढण्याची भूमिका

उभय देशांतील परिस्थिती अशीच राहिल्यास पुढे काय होईल, हे माझ्याही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियंत्रणात राहणार नाही. त्यामुळे एकत्र येऊन समस्यांवर तोडगा काढू, अशा शब्दांत खान यांनी नरमाईची भूमिका जाहीर केली. मोठ्या युद्धामध्ये नेहमी गणिते चुकतात, असे सांगत खान यांनी पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध, अमेरिकेच्या अफगाणिस्तान व व्हिएतनाममधली युद्धांचा दाखला दिला. यापूर्वी त्यांनी मंगळवारी बालाकोट येथे भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर भारताला योग्यवेळी प्रत्युत्तर देणार असल्याची दर्पोक्‍ती केली होती.

Back to top button