दहशतवाद्यांशी चकमक; श्रीलंकेत १५ ठार | पुढारी

दहशतवाद्यांशी चकमक; श्रीलंकेत १५ ठार

कोलंबो (श्रीलंका) : पुढारी ऑनलाईन

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटानंतर तेथील सुरक्षा दलाने शोधमोहीम तीव्र केली आहे. श्रीलंकेतील पूर्व भागात सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत १५ जण ठार झाले आहेत. यात सहा मुले आणि तीन महिलांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांचे विशेष कृती दल आणि लष्कराच्या जवानांनी शुक्रवारी रात्री कोलंबोपासून ३६० किलोमीटरवरील कलमुनई शहराजवळील एका संशयित ठिकाणी कारवाई सुरू केली. याच दरम्यान एका संशयिताने स्फोट घडवून आणत स्वतःला उडवून दिले. तसेच यावेळी दहशतवाद्यांनी तीन स्फोट घडवून आणले आणि गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात १५ ठार झाले आहेत. मृतांमध्ये आत्मघाती हल्लेखोरांचा समावेश आहे, अशी माहिती पोलिस प्रवक्ते रुवान गुनासेकरा यांनी दिली आहे. 

या कारवाईनंतर श्रीलंकेतील कलमुनई, सम्मनतुरई भागात संचारबंदी लागू केली आहे. तसेच रविवारी होणाऱ्या चर्चमधील प्रार्थना रद्द केल्या आहेत. लोकांनी घऱातून बाहेर पडू नये, अशा सूचना पोलिसांनी केल्या आहेत.

सुरक्षा दलाने ज्या ठिकाणी दहशतवाद्यांवर कारवाई केली; तेथून स्फोटके, आत्मघाती हल्ल्याची यंत्रणा, लष्करी गणवेश, इस्लामिक स्टेट ग्रुपचा फ्लॅग जप्त केला आहे. आत्मघाती हल्ल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर चर्च, मंदिरे आणि मशिद परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

तसेच पोलिसांना कोलंबो जवळील वेलावाटा रेल्वे स्टेशनजवळ एक किलो स्फोटके आढळून आली आहेत. काल रात्री सुरक्षा परिषदेची बैठक झाली होती. त्यात सर्च ऑपरेशन तीव्र करून दहशतवाद्यांना मारण्याचा निर्णय घेतला होता. 

ईस्टर संडे दिवशी झालेल्या ९ साखळी बॉम्बस्फोटात २५३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे ५०० जण जखमी झाले आहेत. यानंतर श्रीलंकेत आणीबाणी लागू केली आहे. दहशतवाद्यांविरोधात श्रीलंकेतील सुरक्षा दलाने तीव्र मोहीम हाती घेतली आहे.

Back to top button