प्रिती झिंटाच्‍या एक्‍स बॉयफ्रेंड नेस वाडियास ड्रग्ज प्रकरणात जपानमध्ये दोन वर्षांची शिक्षा | पुढारी

प्रिती झिंटाच्‍या एक्‍स बॉयफ्रेंड नेस वाडियास ड्रग्ज प्रकरणात जपानमध्ये दोन वर्षांची शिक्षा

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 

जपानच्‍या न्‍यायालयाने भारतीय उद्योगपती नेस वाडिया यांना ड्रग्ज  (अंमली पदार्थ ) बाळगल्‍या प्रकरणी दोन वर्षाच्‍या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी असणार्‍या नेस वाडिया यांना जपानमध्‍ये स्कीइंगच्‍या सुट्ट्‍यांच्‍या दरम्‍यान ड्रग्‍ज बाळगल्‍याप्रकरणी शिक्षा सुनावन्‍यात आली आहे. 

नेस वाडिया यांना २० मार्च २०१९ च्या आधीच आयलँडमधील विमानतळावर अटक करण्यात आली होती. मात्र जामिनावर बाहेर येऊन ते भारतात परतले होते. वैयक्तिक वापरासाठी ड्रग्ज बाळगल्याची नेस वाडिया यांनी कबुली दिली होती. नेस वाडिया यांच्याकडे २५  ग्रॅम ड्रग्ज सापडले होते. 

कोण आहेत नेस वाडिया?

नेस वाडिया हे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती नुस्ली वाडिया यांचे पुत्र आहेत.  ते वाडिया ग्रुपचे एकमेव वारसदार आहेत. आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबचे ते सह-मालक सुद्धा आहेत. ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि गो एअर या कंपन्याही वाडिया ग्रुपच्या मालकीच्या आहेत. जवळपास ९१ हजार ७०० कोटी रुपयांच्या वाडिया ग्रुपच्या कंपन्या आहेत. 

यासोबतच  नेस वाडिया चर्चेत आले ते बॉलीवूडची बबली गर्ल अभिनेत्री प्रीती झिंटा हिच्‍यासोबतच्‍या नातेसंबंधावरुन. नेस वाडिया आणि प्रीती झिंटा लग्‍न करणार असल्‍याची चर्चा होती. मात्र त्‍यांचे नाते जास्‍तकाळ टिकू  शकले नाही. २०१४ साली प्रीती झिंटाने नेस वाडिया यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला होता. त्यानंतर काही काळाने तिनेच आपली तक्रार मागे घेतली होती.

Back to top button