निमंत्रण नसले तरी  आमची चर्चेची तयारी : इम्रान खान | पुढारी

निमंत्रण नसले तरी  आमची चर्चेची तयारी : इम्रान खान

इस्लामाबाद/कराची : 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गुरुवारी होणार्‍या शपथविधी कार्यक्रमासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना निमंत्रण देण्यात येणार नाही आहे. पाकची कोंडी करण्यासाठी हे केले जात असले तरी तिकडे पाकिस्तानकडून मात्र या मुद्याला कमी महत्त्व देण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतीय पंतप्रधानांच्या अंतर्गत राजकारणामुळेच ते पाकिस्तानच्या पंतप्रधानांना निमंत्रण पाठवू शकत नसल्याचे पाकने म्हटले आहे. 

भारताने बीआयएमएसटीईसी देशातील पंतप्रधानांना मोदींच्या शपथविधीला निमंत्रण दिल्याचे जाहीर केले होते. तथापि या सात देशांचा भाग नसलेल्या पाकिस्तानला निमंत्रण दिले नसल्याचे स्पष्ट केले होते. बीआयएमएसटीईसी संघटनेत बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूतान आणि नेपाळ या देशांचा समावेश आहे. पाकचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी म्हणाले, काश्मीरप्रश्‍नासह सियाचीन आणि सर क्रिक वादावर तोडग्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. शपथविधीपेक्षा आम्हाला हे मुद्दे जास्त महत्त्वाचे आहेत.

भारताच्या निवडणुकीत मोदींचा सर्व फोकस पाकिस्तानवर टीका करण्यात होता. लगेचच त्या मुद्यांविरोधात जाणे शहाणपणाचे नाही. भारताच्या अंतर्गत राजकारणामुळे मोदी इम्रान यांना निमंत्रण देऊ शकत नाहीत. दरम्यान, मोदी आणि इम्रान खान पुढच्या महिन्यात किरगिझस्थान येथे शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन समिटमध्ये एकत्र येणार आहेत. 

Back to top button