मोदी डिव्हायडर नव्हेत, ‘टाईम’चा यू टर्न | पुढारी

मोदी डिव्हायडर नव्हेत, ‘टाईम’चा यू टर्न

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था

लोकसभा निवडणुकीदरम्यान जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय टाईम मासिकाने 10 मेच्या अंकात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘डिव्हायडर इन चीफ’ असा उल्लेख करत कव्हरस्टोरी केली होती. त्यावरून मासिकाला देशामध्ये रोषालाही सामोरे जावे लागले होते.  निवडणुकीत घवघवीत यश मिळवून नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यानंतर मात्र आता टाईम मासिकाने यू टर्न घेतला आहे. आता ताज्या अंकात प्रसिद्ध केलेल्या नव्या लेखात मात्र भारतासारख्या महाकाय देशाला एकसंध जोडण्याचे काम मोदींनी जसे केले तसे गेल्या कित्येक दशकात कोणत्याही भारतीय पंतप्रधानाला करता आलेले नाही, असे ‘टाईम’ ने  म्हटले आहे. 

मनोज लाडवा यांनी हा लेख लिहिला असून तो ‘टाईम’च्या संकेतस्थळावर आयडिया सेक्शनमध्ये  प्रकाशित झाला आहे. लाडवा हे लंडनस्थित इंडिया आयएनसी ग्रुप या मीडिया संघटनेचे  संस्थापक आणि चीफ एक्झिक्युटिव्ह आहेत. त्यांनी 2014 मध्ये ‘नरेंद्र मोदी फॉर पीएम’ या मोहिमेचे संशोधक आणि विश्‍लेषक म्हणून व्यवस्थापन केले होते. हा लेख म्हणजे टाईम मासिकाने याच महिन्यात 10 तारखेला आतीश तासीर यांच्या मोदींवर लिहिलेल्या ‘डिव्हायडर इन चीफ’ या लेखाच्या अगदी विरोधी आहे. 

23 मे रोजी लागलेल्या लोकसभेच्या निकालात भारतीय जनता पक्षाने 303 जागा जिंकल स्पष्ट बहुमत मिळवले. या पार्श्‍वभूमीवर लाडवा आपल्या लेखात म्हणतात,  मोदींच्या धोरणांवर सातत्याने कडवट टीका केली गेली. टीकाकारांनी त्यांच्या धोरणांना अन्यायी म्हटले. तरीही मोदींच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकालात आणि त्यानंतर मॅरेथॉन निवडणूक प्रचारातही मोदी यांनी देशभरातील मतदार जोडून ठेवला  तसे गेल्या पाच दशकांत कोणत्याही पंतप्रधानाला शक्य झालेले नाही. मोदींच्या सामाजिकदृष्ट्या प्रगतीशील असणार्‍या धोरणांमुळे तमाम भारतीय ज्यामध्ये हिंदू आणि धार्मिक अल्पसंख्याकांचादेखील समावेश आहे. अशा लोकांना गरिबीमुक्त केले आहे. आतापर्यंतच्या भारतीय पिढ्यांच्या तुलनेत हे काम अत्यंत वेगाने झाले आहे. भारतातील मुख्य समस्या असलेल्या वर्गभेदावर मात करता आल्यानेच मोदी निवडणुकीत घवघवीत यश मिळवू शकले. 

मोदींनी जरी दुसरी टर्म मिळवली असली, तरी त्यांना खूप कामे करायची आहेत. पहिल्या टर्ममध्ये नोकरशाहीतील भ्रष्टाचारावर आघात केल्यानंतर त्यांना आता या सरकारी संस्था आगामी अनेक दशकांसाठी भक्कम करायचे आहे. पुरोगामी प्रतिमेसाठी ते चांगले आहे.

Back to top button