व्यापारयुद्ध निवळण्याचे संकेत | पुढारी | पुढारी

व्यापारयुद्ध निवळण्याचे संकेत | पुढारी

ओसाका (जपान) ः वृत्तसंस्था

जागतिक स्तरावर अस्वस्थता निर्माण करणार्‍या व्यापारयुद्धाची कोंडी फुटण्यास जी-20 परिषदेमध्ये मदत झाली आहे. अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांनी यापुढे निर्यातशुल्काची आकारणी न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे जागतिक स्तरावरील व्यापारयुद्ध निवळण्याची चिन्हे आहेत.

अमेरिका व चीन या जगात सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्येच अलीकडे व्यापारयुद्ध सुरू होते. या घटनेचे परिणाम अन्य देशांवरही उमटले होते. त्यामुळे जी-20 परिषदेकडे जागतिक स्तरावरून लक्ष वेधले होते.  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांनी एकमेकांच्या वस्तूंवर यापुढे निर्यातशुल्क लागू करणार नसल्याची घोषणा केली. व्यापारयुद्ध संपुष्टात आणण्यासाठी नव्याने चर्चा करण्यास उभय नेत्यांनी यावेळी सहमती दर्शविली.

व्यापारी संकटातून मार्ग काढण्यासाठी चीनबरोबर ऐतिहासिक व्यापार करार करण्यासाठी आपण तयार आहोत, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. मागे आम्ही करार करण्याच्या समीप असताना काही तरी घडले आणि चर्चा फिस्कटली. आता आम्ही कराराच्या आणखी जवळ आलो आहोत. दोन्ही देशांमध्ये नि:पक्ष व्यापारी करार झाला तर ते ऐतिहासिक असेल, असे उभय नेत्यांनी स्पष्ट केले.  चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांना परस्पर सहकार्याचा फायदा झाला आहे आणि वादामध्ये नुकसान सहन करावे लागले आहे, असे शि जिनपिंग यांनी सांगितले. विसंवाद आणि संघर्षापेक्षा सहकार्य, चर्चा केव्हाही चांगली, असे जिनपिंग यांनी सांगितले. 

जी 20 देशांच्या शिखर बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात खुली व फलदायी स्वरूपाची चर्चा झाली. त्यात, फाईव्ह जी, व्यापार, इराण अशा अनेक विषयांचा समावेश होता. व्यापारातील अडथळ्यांच्या मुद्द्यांवर दोन्ही देशांच्या व्यापार मंत्र्यांची बैठक लवकरच घेण्यास त्यांनी मान्यता दिली. दहशतवादासारख्या जागतिक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी जगाला खंबीर नेतृत्व देण्याचा निर्धार मोदी व ट्रम्प यांनी व्यक्‍त केला. 

इंटरनेटच्या माध्यमातून दहशतवाद्यांना निधीपुरवठा इंटरनेटचा वापर दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी होऊ न देण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जी-20 परिषदेतील अन्य नेत्यांनी केला. इंटरनेटच्या माध्यमातून दहशतवाद्यांना निधीपुरवठा केला जात असल्याचे मोदी यांनी निदर्शनास आणून दिले होते. हवाला आणि काळ्या पैशाला लगाम लावण्यासाठी फॉरेन करप्शन (विदेशी भ्रष्टाचार) विरोधात लढा उभा करण्याचा निर्णयही या बैठकीत झाला.

भारताचे सहा देशांशी महत्त्वपूर्ण द्विपक्षीय करार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेदरम्यान इंडोनेशिया, ब्राझील, तुर्की, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, चिली आदी देशांसोबत सहा द्विपक्षीय करार केले. व्यापार, दहशतवादविरोधी लढा, संरक्षण, सागरी सुरक्षा आणि क्रीडा आदी क्षेत्रांमध्ये हे करार करण्यात आले. दरम्यान, या परिषदेमध्ये मोदी यांनी योगाचेही प्रमोशन केले.

 

Back to top button